ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी गुरुवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह काही इच्छुक ‘पार्लमेंट’ सदस्यांनी पाठिंबा मिळवण्यासाठीची मोहीम गतिमान केली. आपल्या ४५ दिवसांच्या कारकीर्दीत करकपातीसारख्या वादग्रस्त निर्णयामुळे ट्रस यांनी राजीनामा दिला.
आता सत्ताधारी काँन्झव्र्हेटिव्ह पक्ष पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी निवडणूक घेणार आहे. आठवडाभरात ही निवड केली जाईल. जॉन्सन यांच्यासह ब्रिटनचे माजी अर्थमंत्री व पक्षांतर्गत निवडणुकीत ट्रस यांच्याकडून हार पत्करावे लागलेले पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार ऋषी सुनक आणि ‘हाउस ऑफ कॉमन्स’च्या नेत्या पेनी मॉर्डाट यांना सट्टेबाजांनी पसंती दिली आहे. अनेक वादांमुळे जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. नवीन नेत्यासाठी उमेदवारी नामांकन प्रक्रिया सोमवारी दुपारी बंद होईल.