महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरला शिवाजी पार्क येथे दिपोत्सव आयोजित केला आहे. या दीपोत्सव सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी उपस्थिती लावली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या दिपोत्सवाला हजेरी लावल्यानंतर एका नव्या राजकीय समीकरणाबद्दल चर्चा होत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप आणि शिंदेंचा पक्ष हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत असताना शिवाजी पार्कवर काल या महायुतीची रंगीत तालीम पाहायला मिळाली.
पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका मंचावर आले. यानिमित्ताने महायुतीचे दर्शन झाले. मनसेच्या दिपोत्सवात राज्यातील तिन्ही दिग्गज एकत्र आल्याने आता नव्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये हे त्रिदेव एकत्र येणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दिपोत्सवात मुख्यमंत्री काय म्हणाले –
राज ठाकरे यांच्या कल्पकतेतून अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी रोषणाई शिवाजी पार्क येथे करण्यात येते. यंदा देखील शिवाजी पार्कवर केलेली ही रोषणाई सगळ्यांचे लक्ष वेधून घेत एक सकारात्मकता निर्माण करत असल्याचे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
दिवाळीची चांगली सुरुवात आहे. आनंद घेऊया. आम्ही ठरवलंय की, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. कष्टकऱ्यांचे, कामगारांचे आणि प्रत्येक माणसाचं हे सरकार आहे. आम्ही नेहमी आपल्याला सांगितलंय की, कधीही आपण हक्काने आम्हाला सांगा, काहीही सूचना असतील शेवटी तुमचं काही वैयक्तिक काम नसते. तुम्हाला अनेक लोक भेटत असतात, तुम्हाला विनंती करु शकतात आणि सरकारच्या माध्यमातून आपण ते सोडवू शकतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंना म्हणाले.
गणेशोत्सव, नवरात्रौत्सवाप्रमाणेच यंदा दिवाळी देखील नागरिकांनी उत्साहात आणि आनंदात साजरी करावी असे सांगून राज्यातील सर्व नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.