नाशिकच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे 7 नद्यांना पूर आले आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.
नाशिकमध्ये अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे. याशिवाय धोक्याच्या ठिकाणी असलेल्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असंही सांगण्यात आलं आहे.
दुसरीकडे महानगरपालिका क्षेत्रात शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे पालिका प्रशासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू असून सुरगाणा तालुक्यात तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. नार-पार, अंबिका, वाझडी, तान-मान, कावेरी पिंजाळ, दमणगंगा या नद्या तर धोक्याच्या पातळी जवळ पोहचल्या असून पाऊस असाच सुरू राहीला तर या नद्या धोक्याच्या पातळी ओलांडतील. दुसरीकडे पुराच्या पाण्याखाली रस्ते आणि छोटे पूल गेले असल्यामुळें पिंपळसोंड, खुंटविहीर, शिराळा, अळीवपाडा, उंबरवाडा, दोडीपाडा, म्हैसखडक, बोरचोंड, कुकुडमंडा, वाघाडी, आमदा, वांगण, वाजवड, उंबुरणे, मंनखेड आदी गावाचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.