श्रावणाच्या पवित्र महिन्यात लावा ही झाडं; घरात सुख-समृद्धी येईल!

श्रावण हा धार्मिक उत्सव, व्रतवैकल्यांचा महिना असतो. वास्तुशास्त्रानुसारही या महिन्याला विशेष महत्त्व आहे. या काळात पावसाळा असल्यानं झाडं लावण्यासाठी उत्तम ऋतु असतो. वास्तुशास्त्रानुसार झाडंसुद्धा कोणती लावावीत याचे काही संकेत आहेत. त्यातही श्रावणात कोणती झाडं लावल्यानं त्याचं काय फळ मिळू शकेल, याबद्दल टीव्ही 9 हिंदीनं वृत्त दिलं आहे.

भारतात श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. या काळात सण, व्रतवैकल्यं, धार्मिक उत्सव साजरे केले जातात. उत्तर भारतातील पंचांगानुसार यंदा 14 जुलै 2022 पासून श्रावण सुरू होतो आहे, तर 12 ऑगस्टला श्रावण संपणार आहे. वास्तुशास्त्रानुसार या महिन्यात घरात काही झाडं लावली, तर त्याचं उत्तम फळ मिळतं. घरात सुख-समृद्धी नांदते.

तुळस

वास्तुशास्त्रानुसार श्रावणात तुळशीचं रोप घरात लावावं. घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळस लावावी. तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. ही वनस्पती आरोग्यदायीही आहे. त्यामुळे घरात तुळस असावी असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. श्रावणाच्या महिन्यात तुळस लावल्यानं घरात सुख-समृद्धी येते.

केळी

केळीचं झाडही श्रावणात आपल्या घरी लावणं चांगलं असतं. हे झाड भाग्यदायी समजलं जातं. या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. म्हणजेच घरातील नकारात्मक वातावरण काहीसं कमी होतं. दर गुरुवारी याची पूजा करावी. याची पूजा केल्यानं भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहतो.

धोतरा

वास्तुशास्त्रानुसार धोतऱ्याचं झाडही शुभ असतं. हिंदू धर्मानुसार भगवान शंकरांना धोतऱ्याचं फूल वाहिलं जातं. या झाडामध्ये शंकरांचा वास असतो, असं ज्योतिषशास्त्रात मानलं गेलं आहे. हे झाड श्रावण महिन्यात घरी लावल्यानं धनसंपत्तीत वाढ होते.

चाफा

याचप्रमाणे चाफ्याचं फूलही देवाला वाहिलं जातं. हे झाडही शुभ असतं. श्रावण महिन्यात हे झाड लावता येतं. यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होतं. हे झाड घराच्या वायव्य दिशेला लावावं.

तुळस, केळं, धोतरा, चाफा या सर्वच झाडांचा उपयोग हिंदू शास्त्रांनुसार व्रतवैकल्यांमध्ये केला जातो. विष्णूंना प्रिय असलेली तुळस तर घरोघरी असते. तर केळी व केळीच्या पानांचा उपयोग पूजाअर्चांसाठी केला जातो. धोतरा, चाफा देवाला वाहिले जातात. श्रावण महिन्यात ही झाडं लावण्यामागचा एक उद्देश पावसाळा हा ऋतुही असू शकेल. या काळात झाडांना नैसर्गिकरित्या पाणी मिळून ती बहरतात. त्यामुळेच या काळात झाडं लावावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.