येणके गावाकडून सावित्रीच्या लेकींचा सन्मान
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने कराड तालुक्यातील येणके गावाने एक अभिनव आणि क्रांतिकारी उपक्रम राबवला. गावात ७५ विधवा महिलांच्या हस्ते ७५ राष्ट्रध्वज फडकवून महिला सन्मानाचे एक अनोखे उदाहरण येणके गावाने घालून दिले.
स्वातंत्र्य दिनी गावाच्या प्रमुख ध्वजारोहण कार्यक्रमात विधवा महिलांनी तिरंगा ध्वज फडकवण्याची भारतातील ही पहिलीच व ऐतिहासिक घटना असल्याचे ग्रामस्थांचे आणि गाव पुढाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अर्थात ७५ वा स्वातंत्र्य दिन साधून येणकेत ७५ विधवा माता, भगिनींच्या हस्ते ७५ ध्वज फडकवून सावित्रीच्या लेकींना मानसन्मान करण्यात आला. यापुढे गावातील विधवा महिलांना विधवा असे न संबोधता त्याचे संघर्ष भगिनी महिला असेही नामकरण करण्यात आले आहे. विधवा माता भगिनींना सन्मान देण्यासाठी येणके गावातील ग्रामसेवा सार्वजनिक प्रतिष्ठान ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ यांनी एक पाऊल पुढे जाऊन तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा मान दिला. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ ध्वज तेही विधवा माता-भगिनींच्या हस्ते फडकवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन तो २५ ऑगस्ट रोजी सत्यात उतरवला आहे. हा सन्मान मिळाल्यानंतर विधवा माता भगिनींच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघाले. या अमृत महोत्सवी ध्वजारोहण प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती आप्पासाहेब गरुड सरपंच निकहत मोमीन, उपसरपंच नीलम गरुड तसेच सर्व सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.