मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकेतील नामिबियातून आणलेल्या दोन नर चित्त्यांना विलगीकरणातून मोठय़ा अनुकूल परिवेशात सोडले होते. त्यानंतर २४ तासांच्या आत त्यांनी पहिल्या भक्ष्याची शिकार केल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक उत्तमकुमार शर्मा यांनी दिली. चित्त्यांनी सोमवारी पहाटे एका चितळाची (पांढरे ठिपके असलेले हरीण) शिकार केली. सोमवारी सकाळी वननिरीक्षक पथकाला ही माहिती मिळाली, असे त्यांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये नामिबियातून भारतात स्थलांतरित केले गेल्यानंतर या चित्त्यांनी केलेली ही पहिली शिकार आहे. फ्रेडी आणि अल्टन या चित्त्यांना १७ सप्टेंबरपासून विलगीकरणात ठेवल्यानंतर शनिवारी मोठय़ा परिवेशात सोडले होते.
मोठय़ा आवारात गेल्यानंतर २४ तासांच्या आत चित्त्यांनी यशस्वी रीत्या पहिली शिकार केली. त्यामुळे भारतीय भूमीवर नव्या परिवेशात त्यांच्या शिकार करण्याच्या क्षमता कशी असेल, ही राष्ट्रीय उद्यान व्यवस्थापनाला वाटणारी शंका आता दूर झाली आहे. शर्मानी सांगितले, की शिकार केल्यानंतर दोन तासांत चित्ते त्यांची शिकार खातात. या दोन चित्त्यांना शनिवारी विलग ठेवलेल्या क्षेत्रातून ९८ हेक्टरमध्ये पसरलेल्या मोठय़ा परिवेशात सोडण्यात आले. इतर सहा चित्त्यांनाही टप्प्या-टप्प्याने या मोठय़ा परिवेशाशी जुळवून घेण्यासाठी या मोठय़ा क्षेत्रात (अॅक्लिमेटायझेशन एन्क्लोजर) सोडण्यात येतील.
या आठ चित्त्यांत ३० ते ६६ महिने वयोगटातील पाच मादी आणि तीन नर चित्ते आहेत. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांना या राष्ट्रीय उद्यानातील विलगीकरण क्षेत्रात सोडण्यात आले होते. नियोजनानुसार, फ्रेडी, अल्टन, सवाना, साशा, ओबान, आशा, सिबिली आणि सायसा नावाच्या चित्त्यांना महिनाभर विलग ठेवण्यात येणार होते. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी ठरवलेल्या आंतरराष्ट्रीय निकषानुसार, वन्य प्राण्यांना दुसऱ्या देशात स्थलांतरित होण्यापूर्वी आणि नंतर कोणत्याही संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांना एका महिन्यासाठी विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे.