महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. आता ब्रेक द चैनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असेल. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकोरमायकोसिस वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. यानंतर आता हे निर्बंध येत्या 1 जूनपर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे परिपत्रक शासनाने जाहीर केले आहे.
या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे. हा अहवाल प्रवेश करण्यापूर्वी 48 तासांमधील असणं आवश्यक आहे. दूध संकलन आणि वाहतुकीवर निर्बंध नसतील. तसेच दुधाच्या रिटेल विक्रीला स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांच्या मर्यादेत सूट असेल, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
नवी नियमावली
1) परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 48 तास आधीचा RTPCR रिपोर्ट बंधनकारक
2) महाराष्ट्रातून घोषित केलेल्या संवेदनशील राज्यातून येणाऱ्या RTPCR रिपोर्ट बंधनकारक असणार
3) परराज्यातून मालवाहूतक करणा-यांना RTPCR रिपोर्ट निगेटीव्ह असावा तो 7 दिवस ग्राह्य धरणार
4) मालवाहतूक ट्रकमध्ये केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाचं प्रवेश
5) बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थनानिक आपत्ती व्यवस्थापनाने तो बंद करण्याचा निर्णय घ्यावा
6) दूधाचे कलेक्शन, वाहतूक आणि प्रकिया यांना परवानगी असणार
7) एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल मेट्रो आणि मेट्रो मध्ये प्रवाशांची परवानगी.