स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात एक मोठी आरोग्य योजना सुरू करू शकतात. प्रधानमंत्री समग्र स्वास्थ्य योजना या नावाने ही योजना सुरु केली जाऊ शकते. ही योजना देशातील सर्व आरोग्य सेवा योजनांचा समावेश करेल जेणेकरून प्रत्येक नागरिकाला प्रत्येक योजनेत सहज लाभ घेता येऊ शकेल. याशिवाय पंतप्रधान Heal by India आणि Heal in India या दोन योजनाही सुरू करू शकतात. या दोन्ही योजनांचा उद्देश देशातील वैद्यकीय पर्यटनाला चालना देणे आणि देशातील वैद्यकीय व्यावसायिकांसाठी परदेशात उपचारांची दारे खुली करणे हा आहे.
लाइव्ह मिंटच्या रिपोर्टमध्ये तीन सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, समग्र स्वास्थ्य योजनेचे उद्दिष्ट समान, परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा सर्वत्र उपलब्ध करून देणे हे आहे. ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानाची पुनर्ब्रँडिंग किंवा अॕडव्हान्स व्हर्जन आहे. PM जन आरोग्य योजना (PM-JAY), आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) आणि PM आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM-ABHIM) सारख्या योजनांचा एकूण आरोग्य योजनेत समावेश केला जाईल.
या योजनेची माहिती असलेल्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, या योजनेत सर्व आरोग्य सेवांचा समावेश असेल जेणेकरून प्रत्येक नागरिकाला त्यांचा सहज लाभ घेता येईल. सर्वसमावेशक असलेली ही सर्वात मोठी आरोग्य योजना असेल. अधिकाऱ्याने सांगितले की सरकारच्या सर्व प्रमुख योजना जसे PM-JAY, ABDM आणि PM-ABHIM यांचा यात समावेश केला जाईल.
हील इन इंडिया योजना
भारतात वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी देशात हील इन इंडिया योजना सुरू करू शकतात. भारतात उपचारासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी एक व्यासपीठ निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमुळे परदेशी रुग्णांना देशाच्या कोणत्याही भागात उपचारासाठी रुग्णालयांमध्ये पॅकेज दर, सुविधा आणि उपचाराचा प्रकार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल.
हील बाय इंडिया
हील बाय इंडिया योजनेंतर्गत, भारतीय डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांना शस्त्रक्रियेसाठी परदेशात जाण्याची सुविधा दिली जाईल. या योजनेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे हेल्थ प्रोफेशनल अथॉरिटी आणि हॉस्पिटल फॅसिलिटी रजिस्ट्री यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात गुंतले आहेत.