साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचेच काम महाराष्ट्रातील विद्यमान सरकार करत आहे. मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?” असा सवाल केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे l यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केला.
“साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचेच काम महाराष्ट्रातील विद्यमान सरकार करत आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, हे कळतच नाही. केवळ त्यांना वाटतं मी पदावर आहे. मात्र अतिवृष्टी आली, वादळ आलं, दुष्काळ पडला तर केंद्रानेच द्यावं, अशी राज्य सरकारची अपेक्षा असते. मग तुम्ही तिथे कशाला बसलात?” असा टोला नारायण राणे यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? असा सवालही राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केला.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली अर्बन बँकेच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांनी उद्योजकता प्रोत्साहन आणि प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थितांना मार्गदशन करत होते. राणेंनी मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका केली. सध्याचे मुख्यमंत्री अज्ञानी आहेत, असेही राणे म्हणाले.
गोरगरिबांसाठी पंतप्रधानांनी सात वर्षांत अनेक योजना दिल्या. शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान देण्याचे काम केले. आरोप प्रत्यारोपांमध्ये आम्हाला वेळ घालवायचा नाही. समाजातील प्रत्येक नागरिकांचे उत्पन्न कसे वाढेल. त्यांचे जीवनमान कसे उंचावेल, त्यांची प्रगती कशी होईल, शिक्षण, आरोग्य अशा सुविधा सर्वसामान्यांना मिळाल्या पाहिजेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असं राणे म्हणाले. यावेळी या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता, आमदार आणि भाजपचे पदाधिकारी ही उपस्थित होते.