आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांची राजपथ पथसंचलनाकरिता निवड

नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी एक अतिशय आनंदाची बातमी. प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनाकरिता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या दोन स्वंयसेवकांची निवड झाली आहे. इगतपुरी येथील एस.एम.बी.टी. आयुर्वेद महाविद्यालयाचा पिल्लई फ्रॅन्को प्रिन्स व नाशिक येथील मोतिवाला होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी सना शेख विद्यार्थ्यांची राजपथ नवी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनाकरिता निवड झाली आहे. या निवडीबद्दल कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्र सरकारच्या युवा व खेल मंत्रालय आणि राज्य शासन यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक 26 जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पथसंचलन पथकात सहभागी होतात. याअनुषंगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे 12 ते 21 ऑक्टोबर 2021 कालावधीत पूर्व प्रजासत्ताक पथसंचलन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहभागी स्वयंसेवकातून उत्कृष्ट संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करणाऱ्या राज्यातील 8 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. यामध्ये चार विद्यार्थी व चार विद्यार्थींनींचा समावेश असतो.

पहिल्यांदाच मिळाला मान

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कारण विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील 2 स्वयंसेवकांची राष्ट्रीय पथसंचलन पथकात पहिल्यांदाच निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्र. संचालक तथा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अॅड. संदीप कुलकर्णी आणि महाराष्ट्र व गोव्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रिय संचालक कार्तिकेयन, राष्ट्रीय सेवा योजने राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रभाकर देसाई यांनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या यशासाठी विद्यार्थी कल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बी. आर. पेंढारकर, कक्ष अधिकारी, के. आर. पाटील, आबाजी शिंदे, निकेश बागुल, विजया वाणी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.