नॅशनल कॅडेट कोर म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना याचा देशातील 91 विद्यापीठांनी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अंतर्गत जनरल इलेक्टिव्ह क्रेडिट कोर्स म्हणून अभ्यासक्रमात समावेश केला आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगानं 15 एप्रिलला देशातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना पत्र लिहिलं होतं.
जनरल इलेक्टिव्ह क्रेडीट कोर्स (42) अंतर्गत एनसीसीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. देशातील 91 विद्यापीठांनी याबाबत निर्णय घेतला आहे. सर्वाधिक विद्यापीठींची संख्या तामिळनाडू , पद्दुचेरी आणि अंदमान आणि निकोबार येथील आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमधील विद्यापीठांनी देखील एनसीसीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मूतील केंद्रीय विद्यापीठ, श्रीनगरचं इस्लामिया कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स , त्रिचीमधील सेंट जोसेफ कॉलेजचा देखील समावेश आहे. याशिवाय गुजरातमधील बडोद्याचं महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचं अमिटी विद्यापीठ, ओडिशामधील कालाहांडी विद्यापीठानं देखील एनसीसीचा जीएईसीसी अंतर्गत समावेश केला आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार एनसीसी ला वैकल्पिक विषय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांमध्ये अभ्यासक्रम आणि इतर उपक्रम यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे. सरकारच्या प्रस्तावानुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये तरुणांच्या विकासामध्ये एनसीसीचा पुरेपूर वापर करुण घेण्याचा प्रयत्न आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळानं पहिल्यांदा 2013 मध्ये एनसीसीचा समावेश वैकल्पिक विषय म्हणून करण्याच परिपत्रक जारी केलं. यानंतर 10 हजार 397 शाळा आणि 5098 कॉलेजमध्ये याचा वैकल्पिक विषय म्हणून स्वीकारण्यात आला. यानंतर यूजीसीनं 2016 मध्येही प्रस्ताव ठेवला होता त्यावेळी म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नव्हता.