इयत्ता दहावीनंतर कोणतीही सीईटी परीक्षा न घेता पॉलिटेक्निकसाठी थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. मात्र दुसर्या बाजूला इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक शिक्षणासाठी सीईटी परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आगामी काळात ही सीईटी घेतली जाईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.
उदय सामंत काल सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. यावेळी सामंत यांनी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आणि इतर बाबींवर भाष्य केले. “दहावीनंतर विद्यार्थ्यांचे गुण आणि निकाल प्रमाणपत्र पाहून त्यांना पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच यावेळी या विद्यार्थ्यांची कोणतीही प्रवेश परीक्षा होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच पुढे बोलताना त्यांना राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवरही भाष्य केले. “प्रोफेशनल कोर्सेससाठी सीईटी होईल. त्यासाठी आगामी काळात निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांची सुरक्षितता समोर ठेऊनच हा निर्णय होईल,” असे सामंत म्हणाले.
दरम्यान, त्यांनी सध्या राज्यात पसरत असलेल्या अनेक अफवांवर बोट ठेवले. सध्या बीए, बीकॉम या तसेच इतर विद्याशाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठीसुद्धा प्रवेश परीक्षा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही. बारावी वर्गाचा निकाल हाती आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेवर विचार करण्यात येईल, असे सामंत म्हणाले. तसेच कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना जी प्रमाणपत्रं मिळणार आहेत; त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगीतले.