आज दि.२५ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

पेट्रोल-डिझेलनंतर आता खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात सूट दिली आहे.
सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एका वर्षात 20-20 लाख मेट्रिक टन सोयबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात, सीमा शुल्काशिवाय केली जाऊ शकते. 25 मे 2022 ते 31 मार्च 2024 पर्यंत व्यावसायिकांना ही सूट मिळेल. आयात शुल्क अर्थात इम्पोर्ट ड्यूटी आणि सेस अर्थात उपकरातील या कपातीमुळे ग्राहकांना खाद्यतेल स्वस्त दरात उपलब्ध होईल. गेल्या दोन वर्षात खाद्यतेलाच्या किमती दुपटीने वाढल्या असताना सरकारने काहीसा दिलासा देत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

काँग्रेसचा ‘हात’ सोडून कपिल सिब्बल यांची ‘सायकल’स्वारी; सपाच्या मदतीने करणार राज्यसभेची वारी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला रामराम केला आहे. काँग्रेसच्या जी-23 मधील प्रमुख बंडखोर असलेल्या कपिल सिब्बल यांनी गुपचूप काँग्रेस पक्ष सोडला. काँग्रेस पक्षातून बाहेर पडत कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाची वाट धरली आहे. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने कपिल सिब्बल राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांनी अधिकृतपणे समाजवादी पक्षाचं सदस्यत्व घेतलेलं नाहीये. मात्र, सपाच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेत दाखल होतील.

‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणणाऱ्यांना अनाथ आश्रमातल्या शितलने दिले सणसणीत उत्तर, शेतकरी मुलाशी थाटला संसार!

आपल्या स्वप्नातील राजकुमार कसा असावा, हे आजच्या मुलींनी ठामपणे ठरवून टाकले आहे. मेट्रो शहरांचा झगमगाट, मॉडर्न राहण्याची ओढ आणि राजा-राणीचा संसारच सुखी संसार असं चित्र मुलींनी मनात रंगवून टाकलं. त्यामुळे शेतकरी नवरा नको गं बाई!, असा मनाशी चंग बांधणाऱ्या मुलींसाठी साई आश्रय अनाथालयातील शितल या नववधूने सणसणीत उत्तर दिलं. ‘करेन तर शेतकरी मुलांशी लग्न करेल अन्यथा अविवाहित राहील’ असा निर्धार शितलने केला होता. त्यामुळे तिचा विवाह आता धुळे जिल्ह्यातील शेतकरी मुला बरोबर आज पार पडला.

ईशान्येकडील राज्यांकडे आधी दुर्लक्ष होत असे, आता भारतीय असल्याचा अभिमान वाटतो-बिरेन सिंह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 26 मे 22 रोजी आठ वर्षं पूर्ण होत आहेत. या निमित्तानं भाजपनं जोरदार सेलिब्रेशनची तयारी सुरु केली आहे. वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमातून केलेल्या कामांची जोरदार प्रसिद्धी करण्याचं भाजपचं नियोजन आहे. ईशान्येकडील राज्यांना केंद्रात मोदी सरकार आल्यामुळे काय फायदे झाले याबद्दल मणिपुरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी न्यूज 18 ला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांची वैयक्तिक मतंही व्यक्त केली आहेत.

नांदेडमधील प्रसिद्ध डॉ. देवानंद जाजू यांची झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या, शहरात खळबळ

नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध डॉ. देवानंद जाजू यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आपलं आयुष्य संपविल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. डॉ. देवानंद जाजू यांच्या आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. देवानंद जाजू हे शहरातील प्रसिद्ध जाजू हॉस्पिटलचे प्रमुख होते. तसेच ते भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख होते. डॉ. जाजू यांनी आत्महत्या का केली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नांदेडचे ग्रामीण पोलीस याप्रकरणी तपास करत असून तपासाअंती सत्य बाहेर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

“जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या” शरद पवारांचं थेट मोदी सरकारला आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आज राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी करत शरद पवारांनी थेट मोदी सरकारला आव्हान दिलं आहे.
शरद पवार म्हणाले, अनेकजण म्हणतात की यांची नक्की लोकसंख्या किती?, इतकी लोकसंख्या आहे की नाही याबाबत शंका उपस्थित करतात. आजच्या परिषदेत एक ठराव मान्य केला तो म्हणजे, केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी. एकदा करुनच टाका आणि कळून जाऊ द्या देशाला की नक्की किती लोकसंख्या आहे आणि त्यासंख्येप्रमाणे न्यायाची वाटणी करा. इथं कुणी फुकट मागत नाही. जो अधिकार आहे न्यायाचा तो अधिकार मिळाला पाहिजे. तो किती मिळाला पाहिजे हे ठरवायचं असेल तर या प्रकारची जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय पर्याय नाही.

लोकांकडं पैशांची भीक मागणारा व्यक्ती निघाला करोडपती, 10 वर्षांपासून काढला नाही पगार!

एखादा व्यक्ती अस्वच्छ कपडे घालून फिरत असेल तर बऱ्याच जणांना तो भिकारी आहे, असं वाटतं. त्या व्यक्तीनं खायला-प्यायला काही मागितलं किंवा पैसे मागितले, तर लोक देतात. भीक मागून आयुष्य काढणाऱ्या या व्यक्तींची देखील चांगली संपत्ती असल्याचे प्रकार यापूर्वी देखील उघड आलंय. असाच एक अस्वच्छ आणि घाण कपड्यांमध्ये फिरणारा स्वच्छता कर्मचारी करोडपती असल्याचं समोर आलंय. मुख्य म्हणजे त्याच्याकडे एवढा पैसा आहे, असं त्याच्यासोबत काम करणाऱ्या कोणालाच माहीत नव्हतं.

पाल असलेली Cold drink दिली, McDonald’s मधील संतापजनक प्रकार

चालता-फिरता भूक लागली किंवा स्वस्तात मस्त पार्टी करायची असेल तर बहुतेकांचे पाय वळतात ते मॅकडोनाल्डकडे. इथलं फास्ट फूड खाणं अनेकांना आवडतं. पण याच प्रसिद्ध फास्ट फूड ब्रांडचा संतापजनक असा व्हिडीओ समोर आला आहे. मॅकडोनाल्डच्या कोल्ड ड्रिंकमध्ये चक्क पाल सापडली आहे. अहमदाबादमधील मॅकडोनाल्ड आऊटलेटमधील हा प्रकार आहे.
मॅकडोनाल्डमध्ये खाण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने त्याच्यासोबत घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. भार्गव जोशी असं या ग्राहकाचं नाव आहे. जो आपल्या मित्रांसोबत आला होता. त्याने इथं काही खाण्यासाठी आणि एक कोल्ड ड्रिंक ऑर्डर केलं. सुरुवातीला तो थोडं कोल्ड ड्रिंक प्यायलासुद्धा. अचानक त्याला तो पित असलेल्या कोल्ड ड्रिंकच्या ग्लासमध्ये पाल तरंगत असल्याचं दिसलं. त्याला धक्काच बसला. त्याने याचा व्हिडीओही ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेला मिळाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून मोठा पुरस्कार

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याने नुकतीच एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबच शेअर केली आहे. नुकताच गौरवला एका पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे. या पुरस्कराबद्दलची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते गौरवला भिमरत्न हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत गौरव म्हणाला की, ”भिमरत्न पुरस्कार सोहळा २०२२. खरच मी या पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये. सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकुन देणाऱ्यासाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे.आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोठा मान आपण दिलात. खूप आभारी आहे.”

‘सर्जरीच्या 23-24 इंच जखमा असूनही मला चालावं लागत होतं,’ सोनाली बेंद्रेने सांगितली कॅन्सर सर्जरीची वेदनादायी आठवण

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. सोनाली आजही अनेकांची क्रश आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये मोजक्याच भूमिका केल्या, परंतु, तिचं काम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याशिवाय तिने छोट्या पडद्यावर अनेक रिअॕलिटी शो जज केले आहेत. याच सोनालीला 2018 मध्ये कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झाला होता. मात्र तिने कॅन्सरवर मात करत आयुष्यातील मोठी लढाई जिंकली. कॅन्सरवर मात करत अनेकांना प्रेरणा देणाऱ्या 47 वर्षांच्या सोनालीने नुकतंच तिच्या कॅन्सर सर्जरीबद्दलची आठवण एका न्यूज पोर्टलला सांगितली आहे.
2018 मध्ये, अभिनेत्री सोनाली बेंद्रेला मेटास्टॅटिक कॅन्सरचे निदान झाले होते. तिचा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने आणि वेळीच उपचार केल्याने ती बरी झाली. परंतु अचानक झालेल्या कॅन्सरच्या निदानामुळे आयुष्याला वेगळं वळण मिळाल्याचं सोनाली सांगते. हा काळ सोनाली आणि तिच्या कुटुंबासाठी खरोखर कठीण होता. कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर ती जास्त स्ट्राँग झाली आहे आणि तिच्या आयुष्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोनही बदलला आहे, असं सोनाली सांगते. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त प्रसिद्ध केलंय.

यासिन मलिकला शिक्षा सुनावण्याआधी काश्मिर तापले, जोरदार दगडफेक

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक हा टेरर फंडिंग प्रकरणात दोषी आढळला आहे. एनआयए कोर्टाने यासीन मलिकला दोषी ठरवलं असून त्याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे.  पण कोर्टाच्या निर्णयाच्या आधी काश्मिरमध्ये दगडफेकीची घटना समोर आली आहे. एका गटाने पोलिसांवर जोरदार दगडफेक केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात तीन मोठ्या घडामोडी, केंद्रबिंदू राज्यसभेची उमेदवारी

राज्यसभा निवडणुकीसाठी सहाव्या जागेच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम आहे. कारण खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्याला राज्यसभेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पाठींबा मिळावा, अशी विनंती केली आहे. पण शिवसेनेकडून त्यांना काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. या अटींमुळे मराठा समन्वयक आक्रमक झाले आहेत. तर संभाजीराजेंनी शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून शिवसेना नेते संजय राऊत आणि कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे संजय राऊत आणि संजय पवार उद्या दुपारी एक वाजता विधान भवनात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी आगामी काळात कुठपर्यंत जातील याचा अंदाज बांधनं आता कठीण आहे.

महावितरणाचा हलगर्जीपणामुळे; खांबात वीज प्रवाह उतरल्याने शॉक लागून मुलाचा मृत्यू

महावितरणच्या हलगर्जीपणा संदर्भातील घटना तुम्ही याआधीही वाचल्या असतील. या हलगर्जीपणामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. यातच आता महाराष्ट्रातालील जालना जिल्ह्यात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

महावितरण कंपनीच्या विद्युत खांबांमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरला. यामुळे नाहक एका निरागस बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.ही घटना जुन्या जालन्यातील राहुल नगर भागात घडली. सूर्यकांत सर्जेराव म्हस्के (वय 12) असे मृत बालकाचे नाव आहे. या खांबाचा यापूर्वीही अनेकांना विजेचा शॉक लागला होता.

विराटला इतिहास बदलण्याची संधी, नॉकआऊट पंच देणार किंग कोहली?

आयपीएल 2022 चा एलिमिनेटर सामना आज लखनऊ सुपर जाएंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होणार आहे. या दोन्ही टीमसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पराभूत झालेल्या टीमचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येईल, तर जिंकलेली टीम राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळेल.

आरसीबी आणि लखनऊ यांच्यात होणाऱ्या या सामन्यात क्रिकेट रसिकांचं लक्ष विराट कोहलीच्या फॉर्मवर असेल. आयपीएलच्या या मोसमात विराट कोहलीला संघर्ष करावा लागला, पण मागच्या काही सामन्यांमध्ये विराटला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. आयपीएलच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये मात्र विराट फार यशस्वी ठरला नाही. हा इतिहास बदलण्यासाठी विराट आज मैदानात उतरेल.

SD Social Media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.