अमेरिकेतील टेक्सास मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टेक्सासमधील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. एका 18 वर्षीय तरुणाने हा गोळीबार केला असल्याचं बोललं जात आहे. आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, मृतकांमध्ये 7 ते 10 वयोगटातील मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले ग्रेड 2, 3 आणि 4 चे विद्यार्थी होते.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोरालाही मारण्यात आले आहे. या गोळीबारात मृतकांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बंदुकधारी तरुण टेक्सासमधील रॉब एलिमेंट्री स्कूलमध्ये हँडगन आणि रायफल घेऊन शिरला. हल्लेखोर हा सॅन अँटोनियो येथील रहिवासी असल्याचं बोललं जात आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी काराइन जीन-पियरे यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या घटनेबाबत कळवण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन हे पाच दिवसीय आशिया दौऱ्यावरुन परतत आहेत.
सीएनएनच्या वृत्तानुसार, या कथित हल्लेखोराने शाळेत गोळीबार करण्यापूर्वी त्याच्या आजीवर गोळ्या झाडून ठार केलं. त्यानंतर त्याने शाळेत अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जो बायडेन यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
वारंवार घडत आहेत घटना
अमेरिकन मीडियानुसार, 2022 मध्ये आतापर्यंत 30 शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 30 हून अधिक जणांचा या गोळीबाराच्या घटनेत मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
फेब्रुवारी 2018 मध्ये पार्कलँड, फ्लोरिडा येथील मार्जोरी स्टोनमॅन डगलस हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतरची ही टेक्सासमधील सर्वात मोठी घटना आहे. त्यावेळी 18 जणांना टार्गेट करण्यात आलं होतं. 2012 या वर्षी न्यूटाऊन येथील कनेक्टिकट एलिमेंट्री स्कूलमध्ये एका बंदूकधाऱ्याने 26 जणांची हत्या केली होती.