नरेंद्र मोदी यांना चहावाल्याचा
मुलगा असे म्हणा : प्रल्हाद मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर जीएसटीवरुन टीका केली. करोना आणि लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली.’ नरेंद्र मोदी असो की आणखी कुणी, त्यांना तुमचं ऐकावंच लागेल, असं म्हणत प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला होता. नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणतात; ही त्यांची चूक असून म्हणायचं असेल तर त्यांना ‘चहावल्याचा मुलगा’ म्हणा असे प्रल्हाद मोदी यांनी म्हटलं आहे.
राज्याच्या रस्त्यांचं सुमारे
१ हजार ८०० कोटी रुपयांचं नुकसान
राज्यात अतिवृष्टी, महापूर आणि दरड दुर्घटनांमुळे राज्याच्या रस्त्यांचं सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक ७०० कोटी रूपयांचे नुकसान कोकण विभागात झाले आहे. त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व नाशिक विभागाचा क्रम आहे.
तेव्हा मला काही कळत नव्हतं,
काय करावं, काय निर्णय घ्यावा : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कोविड मुक्तीचा मार्ग असं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी करोना परिस्थितीशी लढतानाच्या त्यांच्या मानसिकतेबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले, मला राज्यकारभाराचा अनुभव नाही, तरीही मला राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून मी अजून वाटचाल करतो ना करतो, तोच हे करोनाचं संकट पुढे येऊन ठाकलं. तेव्हा मला काही कळत नव्हतं, काय करावं, काय निर्णय घ्यावा, काय सुरु करावं, काय बंद करावं. आजही फार काही कळतं असं नाही. त्यावेळी केंद्राच्या सूचनांनुसार काम सुरु झालं, लॉकडाउनचा पर्याय समोर आला.
भटक्या, निराधार व्यक्तींचं
लसीकरण प्राधान्याने करा
भटके आणि निराधार व्यक्तींना लस घेण्यास अडचणी येत आहेत. आवश्यक साधने नसल्याने रजिस्टर करू शकत नाहीत. यासाठी केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून भटक्या, निराधार व्यक्तींचं लसीकरण प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी आराखडा आखण्यास सांगितला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
केले नितीन गडकरी यांचे कौतुक
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. शिवाय, युतीचं सरकार महाराष्ट्रात आल्याच्या आठवणींना देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी उजाळा दिला आहे. नागपूरमध्ये गडकरींच्या उपस्थितीत रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा
व्हावी, पाकिस्तान संसदेत मागणी
बलात्काऱ्यांना शिक्षा देण्यासाठी कायदे असून देखील बलात्काराची प्रकरणं कमी होताना दिसत नाहीत. गुन्हेगारांना जरब बसणार नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत. त्यामुळे अशा विकृतांमध्ये शिक्षेचं भय निर्माण व्हावं, यासाठी कठोरात कठोर शिक्षेची तरतूद व्हायला हवी, अशी मागणी भारतात देखील अनेकदा करण्यात आली आहे. त्याच प्रकारची मागणी आता पाकिस्तानात केली जात असून सर्वपक्षीय महिला खासदारांनीच संसदेमध्ये ही मागणी मांडली आहे.
विक्रमी वेळा आमदार झालेले
गणपतराव देशमुख यांचे निधन
तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकारणातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
पंकजा मुंडे यांना शिवसेनेची
ऑफर मी दिली होती : गुलाबराव
भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. ही मागणी होत असतानाच शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी एक विधान करून खळबळ उडवून दिली. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देणारा पहिला मीच होतो, असं विधान गुलाबराव पाटील यांनी करून चर्चेचं माहोळ उठवून दिलं आहे.
SD social media
9850 60 3590