रनमशिन विराट सुसाट, श्रीलंकेविरुद्ध झळकावलं शतक
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलनंतर किंग कोहलीने देखील शतक ठोकले आहे. किंग कोहलीचे हे 74 वे शतक असून या शतकासह विराटने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने गुवाहाटीत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यातही विस्फोटक फलंदाजी करून 80 चेंडूत त्याने शतक ठोकले होते. विराटच्या या शतकानंतर त्याच्यावर सर्वस्थरातून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज पारपडत आहे. या वनडे मालिकेत आतापर्यंत भारताने दोन सामने जिंकले असून मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. या दोन विजयासह भारताने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका जवळपास खिशात घातली असून आज देखील भारताचा संघ श्रीलंकेवर भारी पडताना दिसत आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमनने देखील या सामन्यात 89 चेंडूत शतक ठोकले. तर आता किंग कोहलीने देखील शतक ठोकून पुन्हा एकदा गर्जना केली आहे. विराटने 85 चेंडूत नाबाद शतक ठोकले आहे.भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे आज ग्रीन फिल्ड तिरुअनंतपुरममध्ये वादळ पाहायला मिळाले. विराटने तर त्याचे दीडशतक त्याने साजरे केले. तर शुबमन गिलने देखील त्याचे कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने ३९० धावांचा मोठा डोंगर उभारला असून व्हाईटवॉश टाळण्यासाठी लंकेला विजयासाठी ३९१ धावांची गरज आहे.
भर सामन्यात मोठा अपघात, खेळाडूला स्ट्रेचरवरून न्यावं लागलं बाहेर
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने मारलेला चेंडू अडवताना श्रीलंकेचे दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना धडकले. यामध्ये अशेन बंडारा आणि वँडरसे यांना दुखापत झाली आहे. यामुळे दोघांनाही मैदान सोडावं लागलं.
विराट कोहली 94 धावांवर खेळत असताना त्याने फटकावलेला चेंडू अडवण्यासाठी श्रीलंकेचे दोन खेळाडू धावत होते. सीमारेषेवर चेंडू अडवत असताना अशेन बंडाराला वँडरसे जोरात धडकला. यात त्यानतंर श्रीलंकेचे फिजिओ मैदानात आले. खेळाडूंसोबत चर्चा केल्यानतंर स्ट्रेचर आणण्यात आले. बंडाराला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं तर वँडरसेला मार लागला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनीही बीडमध्ये येऊन टाळला पंकजा मुंडेंचा उल्लेख
‘नाथांचा आशिर्वाद घेण्यासाठी गहिनीनाथ गडावर आलो. माझ्या राजकारणात गोपीनाथांचा आशीर्वाद मिळाला’ असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा नामुल्लेख टाळला. आपल्या 15 मिनिटांच्या भाषणात फक्त माजी पालकमंत्री म्हणूनच पंकजा यांचा एकदाच उल्लेख केला.बीडच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर आयोजित संत वामनभाऊ महाराज यांच्या 47 व्या पुण्यतिथी सोहळयाला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. मात्र या कार्यक्रमाला मुंडे भगिणी गैरहजर होत्या. देवेंद्र फडणवीस यांनीही पंधरा मिनिटांच्या भाषणामध्ये ओझरता माजी पालकमंत्री पंकजा मुंडे असा उल्लेख केला.
शिवरायांना पुष्पहार अर्पण केला अन् सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एक दुर्घटना घडली आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान साडीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने वेळीच हे लक्षात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
खासदार सुप्रिया सुळे पुण्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी हिंजवडीमध्ये त्यांच्या हस्ते कराटे प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी दीप प्रज्वलन करण्यासाठी सुप्रिया सुळे या पुढे आल्या.
पदवीधर परीक्षा आणि निवडणुका एकाच दिवशी
जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. येत्या ३० जानेवारीला पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका आहे. पदवीधरांच्या परिक्षा आणि निवडणूका एकाच दिवशी आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढावा अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. या संदर्भात पडळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. या लोकशाहीत निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत.अशा परिस्थितीत कोण्याही व्यक्ती अथवा वर्गाला मतदानापासून वंचित रहावे लागणे त्याच्यावर अन्याय होण्यासारखे आहे.
नितीन गडकरींना धमकी देणारा निघाला कुख्यात गुंड; तुरुंगातून केला फोन
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात १०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन कॉल आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. १०० कोटी रुपये न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून आणू अशीही धमकी या फोनकॉलद्वारे देण्यात आली होती. दरम्यान, ही धमकी कर्नाटकमधील एका तुरुंगातून देण्यात आल्याचे समोर आले आहे. धमकी देणाऱ्या तुरुंगातील व्यक्तीचे नाव जयेश कांता असे आहे.
लँडिंगच्या १० सेकंद आधी घडलं विपरीत, विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह ७२ जणांचा दुर्दैवी अंत
नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-७२ हे प्रवासी विमान ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधी हे विमान अपघातग्रस्त झाले आहेत. या विमानातील सर्वजण मृत पावल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. हे विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावर असणाऱ्या सेती गंडकी नदीच्या काठावरील जंगलात कोसळलं.
SD Social Media
9850 60 3590