शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता बळकावल्याचा आरोप भाजप (BJP) नेहमीच करत आलंय. मात्र आता आघाडी सरकारमधल्या दोन जुन्या मित्रांमध्ये खंजीर खुपसण्यावरून वाद उफाळून आलाय.
हे मित्र आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर खंजीर खुपसण्याचा खळबळजनक आरोप केला आहे. एवढंच नव्हे तर सोक्षमोक्ष लावण्याचा निर्वाणीचा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीला देऊन टाकलाय.
राष्ट्रवादीनं अनेक ठिकाणी भाजपची युती केली आहे. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्याशी बोलणं झाल्यावरही प्रत्येक ठिकाणी भाजपशी युती केली. आमच्या पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप नाना पटोले यंनी केला आहे.
या वादाला तोंड फुटलंय ते भंडारा गोंदिया झेडपी आणि पंचायत समिती अध्यक्षपदाच्या निवडीवरून. राष्ट्रवादीनं अनेक ठिकाणी भाजपला साथ दिल्यामुळेच भंडाऱ्यात भाजपच्या झेडपी सदस्यांची मदत घेतल्याचा दावा नाना पटोलेंनी केला. मात्र स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचा राज्यातल्या आघाडीवर परिणाम होणार नसल्याचं जयंत पाटल यांनी स्पष्ट केलं असलं तरी जबाबदार नेत्यांनी खंजीरची भाषा वापरू नये असा पलटवारही त्यांनी पटोलेंवर केलाय.
पण राष्ट्रवादीनं काँग्रेसला शह देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रवादीनं काँग्रेसला पहिला मोठा धक्का मालेगावात दिला. माजी आमदार रशिद शेख यांच्यासह महापौर ताहेरा शेख आणि 27 नगरसेवक पळवले. भिवंडीत काँग्रेसच्या 18 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश केला. अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी भाजपला साथ दिली. तर अर्थमंत्रालय राष्ट्रवादीकडे असताना काँग्रेसच्या आमदारांनी निधी मिळत नसल्याची तक्रारही केली जातेय.
आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या आणाभाका तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते करत आहेत. मात्र आता भंडारा-गोंदियात आघाडी आणि युतीचा धर्म खुंटीला टांगला गेल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीची रणनीती किती कामी येणार आणि या सत्तेच्या साठमारीत भाजपला रोखण्यात यश मिळणार हे महत्त्वाचं आहे.