जगातली सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून टेस्लाचे आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांची ओळख आहे. आता फॉर्च्युन 500 च्या यादीनुसार सगळ्यात जास्त पगार घेणाऱ्यांमध्येही ते पहिल्या स्थानावर आहेत. जगातल्या कोणत्याही कंपनीच्या सीईओजपेक्षा मस्क यांना जास्त पगार मिळतो. 2021मध्ये मस्क यांना 23.5 अब्ज डॉलर्स अर्थात 1.82 लाख कोटी रुपये पगार मिळाला. असं असलं, तरी त्यांची टेस्ला ही इलेक्ट्रिक कार कंपनी फॉर्च्युन 500 कंपन्यांच्या यादीत 65 व्या क्रमांकावर आहे.
अॅपलचे टीम कुक दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना गेल्या वर्षी 77.05 कोटी डॉलर्स म्हणजेच 6 हजार कोटी रुपये इतका पगार मिळाला. अॅपल या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. NVIDIA चे सह-संस्थापक आणि सीईओ जेनसेन हुआंग यांना 50.7 कोटी डॉलर्स पगार असल्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्ज चौथ्या क्रमांकावर आहेत. या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे यातले सगळे सीईओ टेक किंवा बायोटेक कंपन्यांचेच आहेत.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ असलेले भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांनी फॉर्च्युनच्या यादीत सातवं स्थान मिळवलं आहे. गेल्या वर्षी त्यांना 30.94 कोटी डॉलर्स इतका पगार मिळाला. बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीची धुरा गेल्या सहा वर्षांपासून ते सांभाळत आहेत. इकॉनॉमिक पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, साधारणपणे मोठ्या कंपन्यांच्या सीईओजनी सर्वसाधारण कर्मचाऱ्याच्या पगारापेक्षा 351 पट अधिक पैसे कमावले आहेत.
मस्क यांच्या एकूण संपत्तीत वाढ
मस्क हे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, सोमवारी (30 मे) त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठी भर पडून ती 224 अब्ज डॉलर्स इतकी झाली. खरं तर 2022मध्ये त्यांच्या एकूण संपत्तीत 46.4 अब्ज डॉलर्सची घसरण झाली. टेस्ला कंपनीला 2020च्या तुलनेत 2021मध्ये 71 टक्के अधिक महसूल मिळाला. त्यामुळे त्यांचा एकूण महसूल 53.8 अब्ज डॉलर्स इतका झाला. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांची एकूण संपत्ती 139 अब्ज डॉलर्स इतकी असून, ते जगातली दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहेत.
गेल्या काही दिवसांपासून एलॉन मस्क ट्विटर खरेदीच्या निर्णयावरून चर्चेत होते. ट्विटरच्या खरेदीचा निर्णय सध्या स्थगित झाला असला, तरी एलॉन मस्क यांच्या सध्याच्या सांपत्तिक स्थितीमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते आहे. लवकरच ट्विटरची मालकी मस्क यांच्याकडे जाऊ शकते.