राज्याचा कारभार दोघेच बघत असल्याकडे आम्ही लक्ष वेधतो तर त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील प्रारंभी पाचच मंत्री होते, असे चुकीचे सांगतात. त्यावेळी आम्ही सात मंत्री होतो आणि त्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. ते शुक्रवारी नागपुरातील रविभवन येथे माध्यमांशी बोलत होते.
पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रारंभी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली होती. यातील काहीजण मुख्यमंत्रीपद भूषवू शकतील एवढे सक्षम आणि अनुभवी होते. शिवाय त्यावेळी आजच्यासारखी पूर परिस्थती नव्हती. आज विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी व्यथित झाला आहे. पंचनामे नाही आणि तातडीने मदत देखील नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असेही पवार म्हणाले.