‘द गाझी अटॅक’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी करोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांनी बिक्रमजीत यांच्या निधनाची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. ‘करोनामुळे अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाल्याचे ऐकून दु:ख झाले. माजी सैन्य अधिकारी बिक्रमजीत यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे’ असे लिहित त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी बिक्रमजीत हे सैन्यामध्ये कार्यरत होते. २००३ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी ‘पेज ३’, ‘डॉन’, ‘मर्डर २’, ‘क्रिएचर’, ‘आरक्षण’, ‘टू स्टेट’, ‘द गाझी अटॅक’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. ‘ये है चाहतें’, ‘स्पेशल ओपीएस’, ‘अदालत’, ‘दिया और बाती हम’, ‘क्राईम पेट्रोल दस्तक’ या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.