आज दि.१ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

ऑक्सिजन अभावी एका
डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू

रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन, औषध तुटवडा निर्माण झालेला आहे. परिणामी रूग्णांचे हाल सुरू आहेत. अनेक ठिकाणी रूग्णांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने रूग्णांच्या मृत्यूच्या देखील घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना दिल्लीत घडल्याचं समोर आलं आहे, येथील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

तर गिरीश महाजन यांचा भर
चौकात सत्कार करीन : गुलाबराव पाटील

शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातल्या लसीकरणावरून गिरीश महाजन यांना सुनावलं आहे. “गिरीश भाऊंना माझा सल्ला आहे. पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांनी गिरीशभाऊंना वर स्टेजवर बोलावलं होतं. जर त्याचा काही प्रभाव पडला असेल, तर जास्तीत जास्त लस जळगावसाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी आणावी. गिरीशभाऊंनी आवश्यक तो लसीचा साठा महाराष्ट्रासाठी मिळवून दिला, तर त्यांचा मी भर चौकामध्ये सत्कार करीन”, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांना दिलं आहे.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात
विक्रमी जीएसटी कलेक्शन

काही राज्यांनी वाढत्या रुग्णांमुळे कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रोजगार आणि उद्योग धंद्यावर परिणाम झाला आहे. असं असलं तरी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात विक्रमी जीएसटी कलेक्शनची नोंद झाली आहे. सलग सातव्या महिन्यात १ लाख कोटीच्या वर जीएसटी मिळाला आहे. ही माहिती अर्थ खात्याने ट्विटरवर दिली आहे. २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर हे सर्वात विक्रमी उत्पन्न आहे. त्यामुळे मागील सलग सात महिने एक लाख कोटींचे जीएसटी उत्पन्न मिळाल्याने केंद्र सरकारला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

लसीचे २ लाख ४० हजार डोस असलेला
कंटनेर बेवारस अवस्थेत आढळला

महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात लसीकरण केंद्र लसीअभावी बंद ठेवले जात आहेत. असं असताना कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख ४० हजार डोस असलेला एक कंटनेर बेवारस अवस्थेत आढळला आहे. मध्य प्रदेशात हा प्रकार समोर आला आहे. रस्त्याकडेला कंटेनर उभा होता, तर ड्रायव्हर आणि क्लिनर ठिकाणावरून बेपत्ता होते.

भारतात लॉकडाऊन लावण्याचा
अमेरिकेचा सल्ला

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा सल्ला अमेरिका प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी एस फौसी यांनी दिला आहे. डॉ. अँथनी एस फौसी बायडेन प्रशासनात मुख्य आरोग्य सल्लागार आहेत. त्यांनी अमेरिकेच्या सात राष्ट्राध्यक्षांसोबत काम केलं आहे.

गुजरातच्या वेलफेअर रुग्णालयाला
आग १४ रुग्णांचा मृत्यू

गुजरातच्या भरूच परिसरातल्या पटेल वेलफेअर रुग्णालयाला मध्यरात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. पटेल वेलफेअर रुग्णालयातच कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर देखील बनवण्यात आलं होतं. आग लागण्याची घटना घडली, तेव्हा रुग्णालयात कोरोना रुग्ण देखील होते. मात्र, आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू करण्यात आलं. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.

sharad/sdnewsonline.com

सहायता फंडात निधी देण्याबाबत
शरद पवार यांची सूचना

महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मोठी मदत जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) पेटारा उघडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री सहायता फंडात निधी देण्याबाबत पक्षाला सूचना केल्या. त्यानुसार राष्ट्रवादीने दोन कोटी रुपयांचा निधी सीएम फंडात दिला आहे.

pathak/sdnewsonline.com

कोरोनाशी दोन हात करा,
१०२ वर्षांच्या आजींचा सल्ला

राज्यात सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 20 वर्षांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना याचा त्रास होत आहे. यामुळे अनेकांच्या मनात कोरोनाची भीती बसली आहे. पण ही भीती तुम्हाला कोरोनावर मात करु देणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कोरोनाला घाबरलात. तर तुमच्यावर कोणत्याही उपचारांचा परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही कोरोनाला घाबरु नका. त्याच्याशी दोन हात करा. तुम्ही नक्की त्यातून बरे व्हाल, असा संदेश सुशीला पाठक या 102 वर्षांच्या आजींनी दिला आहे.

shikhar.jp/sdnewsonline.com

ऑक्सीजनसाठी शिखर धवनने
दिले वीस लाख रुपये

भारतात आणखीनही कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. दररोज लाखो रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे, हजारो जणांना कोरोनाने मृत्यूला कवटाळावं लागत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक जण आपापल्या परीने मदत देतोय. आतापर्यंत अनेक भारतीय खेळाडूंनी तसंच विदेशी खेळाडूंनीही या संकटसमयी मोलाची मदत केली आहे. दिल्लीचा आक्रमक बॅट्समन जो आयपीएलमध्ये सध्या खोऱ्याने धावा करतोय त्या शिखर धवनने मनाचा मोठेपणा दाखवत सध्या 20 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे, आयपीएल मध्ये बक्षिसरुपी रक्कम कोरोना रुग्णांसाठी देणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.

ajit/sdnewsonline.com

लस परदेशात पाठवायला
नको होती : अजित पवार

सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी लसींचे डोस मागितले आहेत. मात्र, आतापर्यंत आपल्याला फक्त 3 लाख डोस मिळाले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच वेगाने लसीकरण करण्याचा मनसुबा राज्य सरकारला अंमलात आणता येणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

john/sdnewsonline.com

अभिनेता जॉन अब्राहम
मदतीसाठी सरसावला

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम यानेही आता मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स स्वयंसेवी संस्थेकडे सोपवली आहेत. खुद्द जॉन यांने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. जॉनने लिहिले की, ‘सध्या आपला देश बर्‍याच संकटांशी लढा देत आहे. प्रत्येक मिनिटाला असे बरेच लोक आहेत ज्यांना ऑक्सिजन, आयसीयू बेड, लस आणि खाण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. तथापि, या कठीण काळात आपण सर्वजण एकमेकांना आधार देत आहोत.

neta/sdnewsonline.com

बिहारचा बाहुबली शाहबुद्दीनचे
कोरोनामुळे निधन

लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते, माजी खासदार आणि बिहारचा बाहुबली म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद शाहबुद्दीन यांचं आज कोरोनामुळे निधन झालं. दुहेरी हत्याकांडात शिक्षा भोगत असलेल्या शाहबुद्दीन यांना कोरोनाच्या संसर्गानंतर तिहार तुरूंगातून आधी दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं असून, तिहार तुरूंगाचे कारागृह महानिरीक्षकांना ही माहिती दिली आहे.

kavar/sdnewsonline.com

अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन

द गाझी अटॅक’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी करोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.