‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी मालिका लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ही मालिका आणि या मालिकेतील कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. हा कौटुंबिक टीव्ही शो गेल्या 14 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जेठालाल असो, दयाबेन असो की बबिता जी, या शोमधील प्रत्येक व्यक्तिरेखांनी घराघरात आपला ठसा उमटवला आहे. दयाबेन बऱ्याच दिवसांपासून शोमधून गायब होती. तिच्या परतीची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहे. प्रेक्षकही अभिनेत्रीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी नवी शक्कल लढविली आहे. पाहूया नेमकं काय घडलंय.
आता पुन्हा एकदा सर्वांना दयाबेन आणि जेठालालची धम्माल पाहायला मिळणार आहे. वास्तविक, निर्मात्यांनी अलीकडेच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे अॕनिमेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे. लोकप्रिय ‘तारक मेहता का छोटा चश्मा’चा हा तिसरा सीजन आहे. जो उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. तारक मेहता का छोटा चष्माच्या तिसऱ्या सीजनमुळे मुलांसह सर्वांनाच पुन्हा एकदा दयाबेनचा मजेशीर अंदाज ऍनिमेशनच्या माध्यमातून पाहता येईल.
‘तारक मेहता का छोटा चश्मा’ बद्दल बोलताना असित मोदी म्हणतात- ‘तारक मेहता का छोटा चश्मा’ हा खूप मजेदार आणि रंजक शो आहे. ही सीरिज नेहमीच मुलांना आनंदी आणि चकित करते. या शोचा हा तिसरा सीजन आहे. मुलांना पहिले दोन सीजन खूप आवडले होते आणि तिसरा सीजनही तितकाच आवडेल अशी आशा आहे. हा एक मोठा आणि चांगला शो असणार आहे. शोचा पहिला भाग १६ मे रोजी प्रसारित झाला आहे”. दरम्यान ऍनिमेशनच्या माध्यमातून का होईना पण दयाबेनची मजेशीर व्यक्तिरेखा पुन्हा दिसणार यासाठी सर्वच उत्सुक आहेत.
या सीरिजची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वी मुलांच्या आवडत्या तारक मेहता का छोटा चश्माचे दोन सीजन प्रसारित झाले आहेत. या सीरिजला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळाला आहे. आता शोच्या तिसऱ्या सीजनबद्दल प्रेक्षकांसह निर्माते खूप उत्सुक आहेत आणि त्यांना आशा आहे की मागील सीजनप्रमाणेच हा सीजनही मुलांना खूप आवडेल.