रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी आहे. यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं पहिलं विमान संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास मुंबईत दाखल झालं आहे. 218 विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान रोमानियावरुन निघालं आणि शनिवारी संध्याकाळी हे विमान मुंबईत दाखल झालं आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विमानतळावर उपस्थित राहून या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यावेळी मायभूमीत परतल्याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला.
यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले देशभरातील हजारो विद्यार्थी आणि नागरिक युद्धामुळे अडकले आहेत. अशावेळी त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्याची मागणी त्यांचे कुटुंबीय करत होते. रशियाच्या सातत्याने सुरु असलेल्या हल्ल्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठी संकटाला सामोरं जावं लागत आहे. त्यांना खंदकांमध्ये दिवस काढवे लागत आहेत. तसंच खाण्याचीही मोठी आबाळ होत आहे.
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने यूक्रेन आणि रशियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुपपणे मायदेशी परत आणण्याची मोहिम हाती घेतली. त्यानुसार रोमानिया आणि हंगेरी मार्गे या विद्यार्थ्यांना भारतात परत आणलं जात आहे. भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमानाने शनिवारी दुपारी रोमानियातून उड्डान घेतलं आणि शनिवारी संध्याकाळी ते मुंबईत दाखल झालं.