रशिया आणि यूक्रेनमधील भीषण युद्धामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. रशियन सैन्य कुठल्याही क्षणी यूक्रेनची राजधानी कीव शहरावर कब्जा मिळवण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. रशियाकडून सातत्याने मिसाईल, रणगाड्यांद्वारे हल्ले आणि गोळीबार सुरु आहे. तर यूक्रेनकडूनही रशियन सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.
अशावेळी शनिवारी संध्याकाळी यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोदोमीर झेलेन्स्की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी झेलेन्स्की यांनी भारताकडे मदतीची मागणी केलीय. तर शांततेसाठी भारत कोणत्याही प्रकारे योगदान देईल, असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं आहे.
‘भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो. रशियन आक्रमणाबद्दल माहिती दिली. आमच्या भूमीवर 1 लाख आक्रमणकर्ते आहेत. ते अतिशय क्रूरपणे रहिवाशी इमारतींवर हल्ले करत आहेत. सेक्युरिटी काऊन्सिलमध्ये भारतानं आम्हाला राजकीय मदत करावी. एकत्रितपणे आक्रमकांना थांबवूया’, असं आवाहन झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींना केलंय.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींना यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीबद्दल तपशीलवार माहिती दिली. रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं. हिंसाचार तात्काळ थांबवावा आणि संवादाच्या मार्गावर परत यावं असं आवाहन मोदींनी पुन्हा एकदा केलं. तसंच दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणत्याही प्रकारे योगदान देण्याची तयारी भारताने दर्शवली आहे.
त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी यूक्रेनमधअये अडकलेल्या भारतातील विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी यूक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणीही पंतप्रधान मोदींनी केली आहे.