मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी आपल्या मुलीच्या गैरवर्तवणुकीवरुन जाहीर माफी मागितली आहे. त्यांच्या मुलीने एका डॉक्टराला मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरुन टीकेची झोड उठल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर जाहीर माफी मागितली. तसेच आपल्या मुलीच्या वागणुकीचं कोणत्याही प्रकार समर्थन केलं जाऊच शकत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
या घटनेप्रकरणी डॉक्टरांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शनिवारी जवळपास 800 पेक्षा जास्त डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी निदर्शने दिली होती. त्यानंतर रविवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मिझोराम संघटनेने काळी पट्टी बांधून या घटनेवर निषेध व्यक्त केला.
आंदोलकांमधील एकाने आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांची मुलगी छांगतीने बुधवारी एका तज्ज्ञ डॉक्टरावर हल्ला केला. खरंतर छांगती या अचानक संबंधित डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी डॉक्टरने अपॉईंटमेंट घेवून यायला हवं होतं, असं सांगितलं. त्यानंतर रागावलेल्या छांगतीने डॉक्टरावर हल्ला केला, अशी माहिती एका आंदोलकाने दिली.
या सर्व घटनेवर मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे. संबंधित त्वचा रोग डॉक्टराची भेट घेवून आपण माफी मागितली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच आपल्या मुलीविरोधात कठोर कारवाई न केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयएमएचे आभार मानले. डॉक्टरासोबत माझ्या मुलीने केलेल्या गैरवर्तवणुकीवरुन तिचा बचाव करण्यासाठी आम्ही काहीच करणार नाही. आम्ही जनता आणि डॉक्टरची माफी मागतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांआधी छांगतेचा भाऊ रामथानसियामां यांनीदेदेखील सोशल मीडियावर माफी मागितली होती. मानसिक तणावात असल्याने आपल्या बहीणीचा ताबा सुटला, असं त्याने सांगितलं.