आज दि.१२ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

‘लम्पी’मुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भावाने पशूचा मृत्यू होऊन हानी झाल्यास अशा पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज(सोमवार) मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाच्या याच बैठकीत पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याबाबत देखील मान्यता देण्यात आली.

पुढील काही तासांत पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार पाऊस, कशी असेल मुंबईतील स्थिती?

मागील चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. ऐन गणपती विसर्जनाच्या दिवशी बहुतांशी ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याने गणेशभक्तांची पुरती तारांबळ उडाली होती. काल पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला आहे. यानंतर आज पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन तासांत पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पुढील काही तासांत पुण्यासह अहमदनगर, रत्नागिरी, बीड, सातारा, सिंधुदुर्ग, दक्षिण सोलापूर आणि ठाणे आदी ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज मुंबईत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

“फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका”; किशोरी पेडणेकरांची नारायण राणेंवर टीका

शनिवारी (१० सप्टेंबर) मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला.या आरोपानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली. आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे राहील. अशा प्रकारचे हल्ले करू नका. शेवटी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रातच राहायचे आहे, असा इशाराही राणे यांनी ठाकरे गटाला दिला. या इशाऱ्यानंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी राणेंवर निशाणा साधला आहे. नारायण राणेची इमेज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका”. असं म्हणत त्यांनी राणेंवर टीका केली आहे.

काँग्रेसने ट्विट केला हाफ पँटला आग लागल्याचा फोटो; भाजपाचे प्रत्युत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज ( १२ सप्टेंबर ) पाचवा दिवस आहे. त्यात आता काँग्रेसने भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ( आरएसएस ) निशाणा साधला आहे. काँग्रेसने एक फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये अर्धी चड्डी जळताना दिसत आहे. त्यावरून आता काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये संघाचा गणवेश असलेल्या अर्ध्या चड्डीला आग लावल्याचं दिसतं आहे. त्यावर लिहलं की, “देशाला द्वेषाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आणि भाजपा-आरएसएसने केलेले नुकसान भरून काढण्यासाठी, टप्प्या टप्याने भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आपलं ध्येय गाठू.” तसेच, ‘आता फक्त १४५ दिवसं’, असंही त्या फोटोमध्ये लिहण्यात आलं आहे.

मोदींच्या वाढदिवशी १२०० भेटवस्तूंचा लिलाव; १०० रुपयांपासून बोलीला सुरुवात

नरेंद्र मोदी यंदा वयाच्या ७३ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी म्हणजेच मोदींच्या वाढदिवसासाठी भाजपकडून अनेक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबिवण्यात येणार आहेत. यातीलच एक म्हणजे दरवर्षी मोदींच्या वाढदिवस सप्ताहात पार पडणारा लिलाव कार्यक्रम. यंदाही मोदींना भेट म्हणून मिळालेल्या तब्बल १२०० वस्तूंचा लिलाव होणार आहे. या लिलावातून मिळणारे पैसे नमामी गंगे मोहिमेसाठी दान दिले जातील. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाची हे चौथे वर्ष आहे.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा खर्च १,८०० कोटी रुपये; विश्वस्तांची माहिती

अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात गाजलेल्या अयोध्येतील बाबरी मशिद रामजन्मभूमी वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं, तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असं न्यायालयानं आपल्या निकाल पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर राम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू झालं आहे. त्यात आता राम मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे १,८०० कोटी रुपयांचा खर्च येईल, अशी माहिती समोर आली आहे.तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार राम मंदिर उभारणीसाठी १,८०० कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज रामजन्मभूमी निर्माण ट्रस्टचे विश्वस्त चंपत राय यांनी व्यक्त केला.

नितीन गडकरींची मोठी घोषणा! देशात उभारणार इलेक्ट्रिक हायवे; रेल्वेप्रमाणे विजेवर धावणार ट्रक, बसेस

इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. वायू प्रदूषणाची पातळीदेखील वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे कल वाढत आहे. सध्या बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. परंतु, आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ अधिक विस्तारणार आहे. अर्थात त्यामागे कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. भारतात इलेक्ट्रिक हायवे अर्थात विद्युत महामार्ग उभारला जाणार आहे. बस, ट्रकसारखी अवजड वाहनंदेखील विजेवर चालवण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. हे ट्रक आणि बसेस इलेक्ट्रिक वाहनांसारखे असतील; मात्र ही मोठी इलेक्ट्रिक वाहनं महामार्गावर ओव्हरहेड बसवलेल्या इलेक्ट्रिक केबल्सच्या साह्याने चार्ज करता येतील. याबाबतच्या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू झाला आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी (12 सप्टेंबर) इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स या उद्योग संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना एक महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, `सरकार सौर ऊर्जेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक हायवे अर्थात विद्युत महामार्गांच्या विकासावर काम करत आहे. यामुळे उच्च मालवाहतूक क्षमता असलेले ट्रक आणि बसेसचं चार्जिंग सुलभ होईल.

आयसीसी टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ ठरला; रोहित शर्मा कर्णधार

आयसीसी टी २० विश्वचषक २०२२, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका टी २० सामन्यांसाठी भारतीय संघांची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी आयसीसीने केलेल्या घोषणेनुसार भारत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह सुपर १२ मध्ये आहेत. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडचे चार संघ १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यास पात्र ठरण्यासाठी आमनेसामने असतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर १२ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

ICC T20 विश्वचषकासाठी असा असणार भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

आशिया चषक विजेत्या श्रीलंकेला कोट्यवधींचे बक्षीस

एकीकडे देशात बिकट परिस्थिती असताना दुसरीकडे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आपल्या देशवासियांना चार आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी दिली. वानिंदू हसरंगाची (३६ धावा व तीन बळी) अष्टपैलू खेळी, भानुका राजपक्षेची (नाबाद ७१) अप्रतिम खेळी आणि प्रमोद मदूशानच्या (चार बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर २३ धावांनी मात करून सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. आर्थिक संकटामुळे राजकीय अशांती पसरलेल्या श्रीलंकेला या विजयांनंतर कोट्यवधींचे बक्षिसांची रक्कम मिळाली आहे. आशिया चषकातील उपविजेते पाकिस्तानवरही बक्षिसांचा वर्षाव झाला. या दोन्ही संघांना किती रुपयांचे बक्षीस मिळाले जाणून घ्या.आशिया चषक २०२२ चे विजेते म्हणजेच श्रीलंकेच्या संघाला सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दीड लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. दुसरीकडे, पाकिस्तानला आशियाई क्रिकेट काउन्सिल (ACC) कडून बक्षीस म्हणून सुमारे ६० लाख रुपये मिळाले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.