8 पैकी 4 विरोधी पक्षनेत्यांनी सोडला पक्ष, तर दोघं भाजपजवळ, यंदा इतिहास बदलणार का…?
महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 20 दिवसांमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं वाटत होतं पण भाजपने एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करत फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर रविवारी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली, तर सोमवारी एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं. याच विशेष अधिवेशनात अजित पवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली.
विरोधी पक्षनेता आणि पक्ष बदलणं हे मागच्या काही काळातलं समीकरणच झालं आहे, त्यामुळे यावेळी हा इतिहास बदलणार का इतिहासाची पुनरावृत्ती होणार, असा प्रश्न आहे. 2019 साली महाविकासआघाडी सरकार स्थापन व्हायच्या आधी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, पण शरद पवारांनी अजित पवारांचं हे बंड तीनच दिवसांमध्ये मोडून काढलं.
मुख्यमंत्र्यांनी तातडीचा GR काढून घेतला नवीन निर्णय
शिंदे गट आणि भाजपचं युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे सरकारने आता ठाकरे सरकारला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय आणि प्रकल्पास शिंदे सरकार स्थगिती देत आहे. यापूर्वी मेट्रो कार शेड पुन्हा एकदा आरेमध्ये नेण्याचा विचार सुरू आहे. तर दुसरीकडे आता ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या निधीला स्थिगिती देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेले प्रकल्प आता मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचं दिसत आहे.
शिंदे सरकारचा ठाकरे सरकारला मोठा दणका
शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर आता ठाकरे सरकारचे निर्णयास स्थगिती दिली जात आहे. याअंतर्गत फक्त पुणेच नाही तर सर्व जिल्ह्यातील डीपीडीसी निधी वाटपास स्थगिती देण्यात आली आहे. 1 एप्रिल 2022 पासून सर्व डीपीडीसींमार्फत झालेल्या निधी वाटपास स्थगिती दिली आहे. नवे पालकमंत्रीच निधी फेरवाटपाचा निर्णय घेणार आहेत. शिंदे सरकारनं तातडीचा जीआर काढून निधीवाटप थांबवलं आहे. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी कालच मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली होती.
मुंडे भावा-बहिणींची फडणवीस-पवारांकडून निराशा, धनंजय विरोधी पक्षनेते नाहीत, पंकजांचं काय?
एकीकडे धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेतेपदाने हुलकावणी दिली असली, तरी त्यांची बहीण पंकजा मुंडे यांचं काय होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे, त्यामुळे पंकजा मुंडे यांना त्यांच्या मंत्रिमंडळात मोठं पद मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पंकजा मुंडे मंत्री झाल्या तर पुढच्या 6 महिन्यांमध्ये त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद निवडणूक लढवून जिंकावं लागेल. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाच, पण विधान परिषदेचं सदस्यत्वही सोडलं, त्यामुळे या जागेवर भाजप पंकजा मुंडेंना संधी देणार का, यादेखील चर्चा आहेत.
4-5 दिवस जोरदार पावसाचे; पुण्या-मुंबईत ही बरसणार
राज्यात मान्सून पाऊस अनेक ठिकाणी पडत आहे तर काही भागात अद्यापही पावसाने दडी मारली आहे. संपूर्ण कोकणात येत्या 4 ते 5 दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार-पाच दिवस मान्सून कोकणात अधिक सक्रिय होणार आहे. मुंबई ठाणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
औरंगाबादनंतर आता हैदराबादचंही नाव बदलणार
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी (3 जुलै 22) तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पार पडली. या बैठकीतल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर केला. पंतप्रधानांनी असा उल्लेख केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि हैदराबादचं नाव बदलून आता भाग्यनगर होणार का? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं.
अकोल्याचा यात्रेकरू अमरनाथच्या दरीत कोसळला
अमरनाथ यात्रेला गेलेले अकोला जिल्ह्यातील सत्यनारायण तोष्णेयार हे खेचरासह दरीत पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना लष्कराच्या जवानांनी रुग्णालयात दाखल केले.तोष्णेयार हे पत्नी आणि मुलीसह अमरनाथ यात्रेला गेले होते. ते खेचरावर बसून दर्शन करून परत येत असताना बारारीमार्गावर खेचराचा तोल गेला आणि तोष्णेयार सिंध नदीच्या दिशेने १०० फूट दरीत कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. भारतीय लष्कराच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत त्यांना बारारीमार्गे सैन्य दलाच्या शिबिरात हलवले, अशी माहिती संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
देशातील सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक असणारे नामा नागेश्वरा राव ईडीच्या रडारवर
तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) नेते एन चंद्राबाबू नायडू यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे सहकारी आणि सध्याचे तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) खासदार नामा नागेश्वरा राव यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने जप्तीची कारवाई केली. खासदार नामा नागेश्वरा राव यांच्या मधुकॉन ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक आणि प्रवर्तक यांच्या मालकीची ९६.२१ कोटी रुपयांची मालमत्ता आणि इतर मालमत्ता मनी लाँड्रिंग प्रकरणात जप्त केल्या आहेत. खासदार नामा नागेश्वरा राव यांची एकूण संपत्ती ही ३३८ कोटी रुपये आहेत. ते देशातील सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत.
SD Social Media
9850 60 3590