शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेपुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. एकीकडे शिवसेनेनं बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे, शिंदे यांनी भाजपकडे धाव घेतली आहे. मध्यरात्री आसामच्या एका मंत्र्याने हॉटेलमध्ये जाऊन शिंदेंची भेट घेतली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता पाच दिवस उलटले आहे. पण सोपी वाटलेली लढाई आता कायदेशीर पेचात अडकली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम वाढला आहे. रविवारी मध्यरात्री उशिरा आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त एनआयएन वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
अशोक सिंघल यांनी गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये जाऊन शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील अजूनही समोर येऊ शकला नाही. पण, कालपर्यंत शिंदे यांच्या गटाला भाजप संरक्षण देत असल्याचा आरोप होत होता, त्या आरोपाला आता बळ मिळाले आहे.
विशेष म्हणजे, शिवसेनेनं बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहे. पदाधिकाऱ्यांपासून ते राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकींचा धडका लावला आहे. सर्व बंडखोर नेत्यांना जी जी पदं दिली होती, त्या पदावरून हटवण्याची मोहिमच सेनेनं हाती घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह ज्या ज्या नेत्यांना मंत्रिपदं दिली आहे, ती सुद्धा काढून घेतले जाणार आहे. सेनेच्या या आक्रमक खेळीमुळे शिंदे गटामुळे खळबळ उडाली आहे. काही आमदार हे या कारवाईमुळे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये मुक्काम वाढवला आहे. पुढील 30 तारखेपर्यंत हॉटेलमधील बुकिंग वाढवण्यात आले आहे.बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर होणाऱ्या हल्लानंतर आता अशा आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याविषयी चर्चा झाल्याचे समजते आहे. मात्र, बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळेच गुवाहाटीचा मुक्काम वाढल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार स्थापन होईपर्यंत केंद्रीय सुरक्षा पुरवण्याची रणनीती आखली जात आहे.