शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचं निधन, वयाच्या 99 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. मध्यप्रदेशातील नरसिंहपुरमधील झोतेश्वर मंदिरात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते 99 वर्षांचे होते. बऱ्याच काळापासून ते आजारी होते. 3 सप्टेंबर रोजी त्यांनी आपला 99 वा वाढदिवस साजरा केला होता. ते द्वारकाच्या शारदा पीठ आणि ज्योर्तिमठ बद्रीनाथचे शंकराचार्य होते. शंकराचार्यांनी राम मंदिर निर्माणासाठी कायदेशीर लढाई लढली. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनातही सहभाग घेतला होता. स्वरूपानंद सरस्वती यांना हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू मानलं जातं होतं. शंकराचार्यांच्या शेवटच्या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी आणि शिष्य होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर आजूबाजूच्या भागातील लोक त्यांच्या दर्शनासाठी येत आहेत.
कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेचा प्रवास वेगवान होण्यासोबत पर्यावरणपूरकही होणार
कोकणवासीय आणि कोकणात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण, त्यांचा प्रवास आता वेगवान होण्यासोबत पर्यावरणपूरक होणार आहे. कोकण रेल्वेच्या प्रवासी गाड्या विजेवर चालवण्याच्या टप्पानिहाय कार्यक्रमानुसार येत्या 15 सप्टेंबरपासून रेल्वे विद्युत इंजिनसह धावणार आहेत. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त, जलद प्रवासासाठी सज्ज झाल्या आहेत.
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, औरंगाबाद-सिंधुदुर्गात ढगफुटीसदृश पाऊस
महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावासाचा कहर बघायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी जीवितहानीदेखील होताना दिसत आहे. याशिवाय अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. हा पाऊस आणखी किती दिवस अशाप्रकारे बरसत राहील याबाबत अनिश्चितता आहे. पण पावसामुळे सध्याच्या घडीला सर्वसामान्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. विशेष म्हणजे आज औरंगाबाद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्क ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. या पावसामुळे औरंगाबादमध्ये एक वयोवृद्ध महिलेसह दोन अल्पवयीन मुली वाहून गेल्या होत्या. त्यांना नदीतून बाहेर काढण्यासाठी गावकरी, पोलीस आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी शर्थीने प्रयत्न केले. पण तरीही एका 14 वर्षीय मुलीचा तपास लागलेला नाही.
शिवसेनेच्या नेत्या स्वप्नाली सावंत बेपत्ता प्रकरणी मोठी अपडेट, आईच्या तक्रारीनंतर उडाली खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्या आणि माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सुकांत सावंत या गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यापूर्वीही पोलिसांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला होता. आता या प्रकरणात संशयाची सुई स्वप्नाली यांचे पती सुकांत सावंत यांच्यादिशेने गेली आहे.
अकरा दिवसांपासून गायब असलेल्या स्वप्नाली सावंत या प्रकरणात त्यांच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पती सुकांत सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या माजी सभापती असलेल्या स्वप्नाली सावंत अकरा दिवसांपासून गायब आहे. आपल्या मुलीला पतीने जाळून मारल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पती सुकांत सावंत यांच्यासह आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला? बावनकुळेंचं मोठं विधान
काँग्रेसच्या विरोधात बोलले तर ते भाजपाच्या संपर्कात आहेत अस होत नाही. भाजपाचे दार सगळ्यासाठी उघडे आहेत जिथे आम्हाला गरज वाटेल तिथे आम्ही घेऊ, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर केलेल्या विधानामुळे राज्यभरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच बावनकुळे यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
सीएम शिंदेवरच्या टीकेवर श्रीकांत शिंदेंनी शिवसैनिकांना दिलं उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 20 तास काम करतात हे लोकांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे. राज्यामध्ये जे सरकार आले ते मेजॉरिटीचे सरकार आहे.बाकी लोक बोलत असतात. त्यांचे ते कामच आहे. विरोधी बाकावर बसल्यापासून त्यांच्याकडे करण्यासारखे काहीही उरलेले नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर टीका करतात अशा शब्दात बंडखोर खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव काळात विविध ठिकाणी जात गणरायाचे दर्शन घेतले. त्यावर विरोधकांनी जोरादार टीका केली. यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर पलटवार केला आहे.
‘दिल्ली’समोर झुकणार नाही, शरद पवार कडाडले, भाजपवर साधला निशाणा
‘छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आम्हाला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गोष्ट शिकवली आहे, दिल्ली समोर झुकणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात लढण्याचा कानमंत्र दिला.
नवी दिल्लीत राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारणी मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत भाजपवर टीकास्त्र सोडले.
आता मुंबई अहमदाबाद 5 तासांत प्रवास, ‘वंदे भारत’चा स्पीडचा अनोखा विक्रम
आता मुंबई अहमदाबाद प्रवास करणं आणखी सोपं आणि सोयीचं होणार आहे. वंदे भारत ट्रेनच्या गतीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. मुंबई अहमदाबाद प्रवास आता ५ तासांत शक्य होणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनची चाचणी रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (RDSO) च्या देखरेखीखाली घेण्यात आली.
वंदे भारत ट्रेन अहमदाबाद ते सुरत अवघ्या 2 तास 32 मिनिटांत पोहोचली. तर शताब्दी एक्स्प्रेसला अहमदाबादहून सुरतला पोहोचायला तीन तास लागतात. वंदे भारत ट्रेनच्या तिसऱ्या चाचणीदरम्यान अवघ्या 52 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग पकडत बुलेट ट्रेनचा विक्रम मोडला आहे. हा वेग गाठण्यासाठी बुलेट ट्रेनला ५४.६ सेकंद लागतात.
“चीनची चमचेगिरी करणाऱ्यांना मिरच्या का झोंबल्या”, राहुल गांधींच्या टी शर्टवरुन नाना पटोलेंचा खोचक सवाल
काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी घातलेल्या टी शर्टच्या किमतीवरुन भाजपाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेवर पलटवार करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे. “चीनची चमचेगिरी करणारे जे लोक देशात सत्तेत बसले आहेत, त्यांना राहुल गांधींच्या टी शर्टवरुन मिरची का झोंबली?” असा खोचक सवाल पटोले यांनी केला आहे.
पाकिस्तानला F-16 विमानांसाठी अमेरिकेकडून ४५० अब्ज डॉलर्स, भारताने नोंदवला तीव्र निषेध
अमेरिकेने पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानांसाठी तब्बल ४५० अब्ज डॉलर्सचे पॅकेज मंजुर केले आहे. या पॅकेजबाबत भारताने अमेरिकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशियाचे सहाय्यक सचिव डोनाल्ड लू यांच्याकडे भारताने या निर्णयाची वस्तुस्थिती आणि वेळेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
‘एमसीए’च्या अध्यक्षपदासाठी संदीप पाटील इच्छुक
भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील प्रथमच मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. २८ सप्टेंबर रोजी ‘एमसीए’ची निवडणूक होणार असून आपण अध्यक्षपद भूषवण्यासाठी इच्छुक असल्याचे पाटील यांनी सांगितले. ‘‘मुंबई क्रिकेटने मला खूप काही मिळवून दिले आहे. ‘एमसीए’चे माझ्या आयुष्यात खूप मोठे योगदान आहे. आता या योगदानाची मला परतफेड करायची आहे,’’ असे पाटील म्हणाले.
SD Social Media
9850 60 3590