आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने योग शास्त्रामध्ये नवीन डिप्लोमा प्रोग्राम सुरु केला आहे. संस्थेने योगदिनादिवशी उत्साहात या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याच कार्यक्रमात एनआयओएसच्या योग विज्ञान विषयातील डिप्लोमा कोर्स केंद्रीय राज्य शिक्षणमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला.
कोरोना काळात योगाचं महत्त्व सगळ्यांना कळालं
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी कोर्सचं लोकार्पण केलं. तसंच आपल्या भाषणात एनआयओएसला इतका महत्त्वपूर्ण व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. जगातील योगाचे महत्त्व विशेषत: कोविड संसर्गाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि परिणामी योगामध्ये रोजगाराच्या संधींमध्येही वाढ झाली आहे, असं मंत्रीमहोदय म्हणाले.
या प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी केवळ रोजदार करत नाही तर रोजगार देण्यातही महत्त्वाची भूमिका निभावतो, असं धोत्रे म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याच्या प्रयत्नांची तारीफ केली.
या दोन वर्षांच्या डिप्लोमा कोर्समधील पहिल्या वर्षादरम्यान, असे पाच विषय असतील ज्यात योग-अध्यापन-प्रशिक्षण दिले जाईल. तसेच दुसर्या वर्षी योग औषधाशी संबंधित पाच विषय शिकवले जातील, असं एनआयओएसचे अध्यक्ष प्रा. सरोज शर्मा यांनी सांगितलं.
या कार्यक्रमादरम्यान सिंगापूर आणि न्यूझीलंडच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय वेबिनारही आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये न्यूझीलंडचे भारताचे उच्चायुक्त मुक्तेश परदेशी प्रमुख पाहुणे होते. एनआयओएसच्या यूट्यूब वाहिनीवर प्रसारित झालेल्या या कार्यक्रमात 40 हून अधिक देशांनी भाग घेतला.
कोरोना साथीच्या आजाराच्या काळात योगाला महत्त्व दिल्याने रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. आज सुरु केलेला योग विज्ञान अभ्यासक्रम परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी देण्यास मदत करेल.