ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉमरेड मनोहर टाकसाळ यांचे निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉमरेड मनोहर टाकसाळ यांचं वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. काल 30 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामात (Hydarabad Mukti sangram) त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला होता. त्यांचे पार्थिव खोकडपुरा येथील भाकप कार्यलयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. बुधवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कैलासनगर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी लिलाबाई, विवाहित मुलगी क्रांती, मुलगा अजय आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कामात सक्रिय असलेला भाकपचा जिल्हा सहसचिव कॉ. अभय, स्नुषा विद्या व मानसी असा परिवार आहे.

पेशाने वकील असलेले कॉमरेड मनोहर टाकसाळ हे मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी होते. पिराजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वातंत्र्य युद्धात सहभाग घेतला. याच काळात त्यांच्यावर साम्यवादाचे संस्कार झाले. तेव्हाहपासून त्यांनी कष्टकरी, गरीबांच्या कल्याणासाठी अनेक लढे लढले. वकील म्हणून उपेक्षितांना न्याय मिळवून दिला. या संपूर्ण काळात त्यांनी लालबावट्याची साथ कधीही सोडली नाही. 1952 पासून ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते. भाकप जिल्हा सचिव ते राष्ट्रीय कौंसिल सदस्यापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास झाला. महाराष्ट्र राज्य लालबावटा शेजमजूर युनियनचे ते अनेक वर्षे अध्यक्ष राहिले.

कॉमरेड मनोहर टाकसाळ यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. औरंगाबादमध्येही त्यांनी काही काळ शिवाजी हायस्कूल येथे काम केले. परंतु पक्षाचे काम पूर्ण वेळ करण्यासाठी त्यांनी वकिलीचे शिक्षण घेऊन पुढे वकिलीचाच व्यवसाय सुरु केला. याच पेशाद्वारे त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला.
गोवा मुक्तीसंग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात ते अग्रणी होते. तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाच्या आवारात मोर्चा काढल्यामुळे 2007 मध्ये त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.