आज दि.३० नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पुण्यात पहिली ते सातवी पर्यंतच्या
शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी ही परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यभरात उद्या (१ डिसेंबर)पासून पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू होणार असल्या, तरी मुंबई, नाशिक पाठोपाठ आता पुण्यातही या वर्गांच्या शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेच्यावतीने करोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना आज जारी करण्यात आल्या आहेत.

साहित्य संमेलनाच्या ठिकाणी
लसीकरणाचा मांडव टाकण्यात येणार

साहित्य संमेलनात लसीकरणाशिवाय प्रवेश नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले आहेत. आता साहित्य संमेलनाच्या शेजारी चक्क लसीकरणाचा मांडव टाकण्यात येणार आहे. संमेलनस्थळी मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. साहित संमेलन आणि आढळलेला नवा ओमिक्रॉन विषाणू या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तातडीचे बैठक बोलावली होती.

देशात ओमायक्रॉनच्या कोणत्याही
रुग्णाची नोंद नाही : आरोग्यमंत्री

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं की, “करोना संकटात आपण खूप काही शिकलो असून आज आपल्याकडे अनेक संसाधनं, प्रयोगशाळा आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना आपण करु शकतो. दरम्यान आजच्या घडीला देशात करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या कोणत्याही रुग्णाची नोंद झालेली नाही. तसंच हा नवा विषाणू देशात येऊ नये यासाठी संभाव्य प्रत्येक काळजी घेतली जात आहे”.

पुण्यात आलेल्या ‘त्या’ प्रवाशाला
केले होम क्वांरटाइन

दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या ‘त्या’ प्रवाशाला होम क्वांरटाइन करण्यात आले आहे. या प्रवाशाची आरटीपीसीर चाचणी करण्यात आलीपासून अहवाल प्रतीक्षेत आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रयोग शाळेत पाठवून जीनोम सिक्वेसिंग केले जाणार आहे. संबंधित प्रवासी 20 दिवसांपूर्वी आफ्रिकेतून पुण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे पुणे महापालिका सतर्क झाली आहे.

समृद्धी मार्गाचा आता नागपूर
गोंदियापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय

मुंबई ते नागपूर समृद्धी मार्गाचा आता नागपूर गोंदियापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. त्यानुसार नागपूर ते गोंदियादरम्यानच्या विस्तारीकरणासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यात येणार आहे. या कामासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यासाठी एक-दोन दिवसांत निविदा काढण्यात येण्याची शक्यता आहे. नागपूर ते गोंदिया असा साधारणत: १५० किमी महामार्ग असेल. हे विस्तारीकरण झाल्यास मुंबई ते गोंदिया अंतर काही तासांत पार करणे शक्य होणार आहे.

बिहारमध्ये विधानसभा परिसरात
दारुच्या बाटल्या सापडल्या

दारुबंदी असणाऱ्या बिहारमध्ये विधानसभा परिसरात दारुच्या बाटल्या सापडल्याने गदारोळ झाला आहे. बिहार विधानसभा परिसरात दारुच्या मोकळ्या बाटल्या आढलल्या असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरुन राजकारण रंगलं असून माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे आमदार तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दारुच्या बाटल्या सापडल्याने मुख्यमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे असं ते म्हणाले आहेत.

महापरिनिर्वाण दिन साध्या
पद्धतीने आयोजित करण्याच्या सूचना

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारने नवे नियम जारी केलेत. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या संभाव्य धोक्यामुळे चैत्यभूमीवर जायला बंदी घातली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अत्यंत साध्या पद्धतीने आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

1 डिसेंबरपासून SBI कार्डने
खरेदी करणे महागात पडू शकते

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. (SBI Credit Card) उद्या म्हणजेच 1 डिसेंबरपासून SBI कार्डने खरेदी करणे तुमच्यासाठी महागात पडू शकते. वास्तविक, आता तुम्हाला SBI क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या EMI व्यवहारांसाठी अधिक पैसे द्यावे लागतील. SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ने जाहीर केले आहे की EMI व्यवहारांसाठी, कार्डधारकाला आता 99 रुपये प्रक्रिया शुल्क आणि त्यावर कर भरावा लागेल. हा नवीन नियम उद्या 1 डिसेंबर 2021 पासून लागू होईल.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.