‘‘देशात खोलवर रुजलेल्या लोकशाहीचे मोदी प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच त्यांना जागतिक स्तरावर आदराचे स्थान मिळते,’’ असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले.
राजस्थानच्या बांसवाडा येथील मानगड धाम येथे पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झालेल्या सोहळय़ात बोलताना गेहलोत म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांहून अधिक काळात भारतात लोकशाही चांगली रुजली असल्याने देशाने जगात इतिहास घडवला आहे. मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांना खूप मान मिळतो. त्यांना मान मिळतो कारण ते महात्मा गांधींच्या देशाचे पंतप्रधान आहेत.
आपल्या सरकारने राजस्थानमध्ये आदिवासींसाठी महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू करण्यापासून आरोग्य सुविधा पुरविण्यापर्यंत बरेच काही केल्याची माहितीही गेहलोत यांनी दिली. राजस्थानमध्ये राबवण्यात येणाऱ्या चिरंजीवी आरोग्य योजना आपण एकदा अभ्यासावी, असे मोदींना आवाहन करून गेहलोत म्हणाले, की आपण ती देशभर लागू कराल, असा मला विश्वास आहे.
मानगड धामला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची पंतप्रधानांना विनंती करून ते म्हणाले, की अलीकडेच तुम्ही राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या मुख्य सचिवांशी मानगड धामबद्दल बोललात त्यामुळे मला समाधान वाटले. याचा अर्थ असा की ते तुमच्या मनातही हा विचार असावा.