आज दि.२७ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पेगॅसस प्रकरणी चौकशी करण्यासाठी
तज्ञांची समिती गठीत करणार

इस्राईलच्या एनएसओ कंपनीच्या पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून भारतात अनेकांवर हेरगिरी केल्याच्या आरोपांवरील याचिकांची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतलाय. यामुळे आता या प्रकरणातील नेमकं सत्य बाहेर येणार आहे. या निर्णयानुसार पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची विशेष समिती गठीत करण्यात येणार आहे. हीच समिती या प्रकरणाचं सत्य समोर आणेल. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ पेगॅससप्रकरणी ३ वेगळ्या खटल्यांची सुनावणी करत आहे.

सरकारनं आमच्याशी बोलावं
जेणेकरून आम्ही घरी परत जाऊ शकू : राकेश टिकैत

गेल्या ११ महिन्यांपासून दिल्ली सीमेवर शेतकरी संघटना कृषीविषयक कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. याबाबत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सरकार हट्टी असेल तर, शेतकरी देखील आपल्या मागण्यांपासून मागे हटणार नाही, असे म्हटले आहे. आम्ही शेतकरी सरकारच्या चर्चेची वाट पाहत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारनं आमच्याशी बोलावं जेणेकरून आम्ही घरी परत जाऊ शकू,” असंही ते म्हणाले.

कोलंबियाच्या सशस्त्र दलांनी
ड्रग्ज तस्कराला पकडले

कोलंबियाच्या सशस्त्र दलांनी पाब्लो एस्कोबारच्या मृत्यूनंतर अंमली पदार्थांच्या तस्करीतील सर्वात मोठ्या आरोपीला अटक केली आहे. दाइरो आंतोनियो उसुगा उर्फ ओतोनिएल या ड्रग्ज तस्कराला कोलंबियामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर ४३ कोटी रुपयांचे बक्षिस होते. वायव्य कोलंबियातील आंतिओक्विया राज्यातील एका खेड्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी दिली आहे.

फटाक्याच्या दुकानात स्फोट,
पाच जणांचा मृत्यू

फटाक्याच्या दुकानात स्फोट झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २५ जण जखमी झाले आहेत. तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यातील शंकरपुरम शहरात मंगळवारी ही घटना घडली. फटाक्यांच्या अचानक झालेल्या स्फोटामुळे शहरात एकच खळबळ उडाली. शंकरपुरम आणि कल्लाकुरिची येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे
शाळा पुन्हा बंद

करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. आता सर्व शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पुन्हा शाळा बंद झाल्या आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं ४ ऑक्टोबर पासून गजबजून गेले होते. आता हे वर्ग पुन्हा बंद राहतील.

नंदुरबार जिल्ह्य़ांत गुजरातमधील
वस्त्रोद्योग येण्याची शक्यता

सूरतमध्ये जागा नसल्याने गुजरातमधील वस्त्रोद्योगाशी संबंधित उद्योग महाराष्ट्रात यायला तयार झाले आहेत. गुजरातच्या वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यापारी शिष्टमंडळ अलीकडेच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटले. त्या वेळी सूरतपासून धुळे-नंदुरबार जवळ असल्याने येथेच उद्योग उभारण्याचा आग्रह धरण्यात आला. यामुळे प्राधान्याने हे उद्योग धुळे, नंदुरबार जिल्ह्य़ांत येण्याची शक्यता असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. गुजरातच्या सीमेवरील नवापूरमध्ये आधीपासून हे उद्योग स्थिरावत आहेत. त्यांची संख्या वृद्धिंगत झाल्यास आदिवासीबहुल भागाच्या विकासाला गती मिळणार आहे.

समीर वानखेडे यांच्यावर
मंत्री नवाब मलिक यांचे नवे आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्याचा सपाटाच लावला आहे. आजही पत्रकार परिषद घेत त्यांनी आणखी काही नवे आणि गंभीर आरोप वानखेडेंवर केले आहेत. समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागल आहे.

संघावर आरोप करणाऱ्या व्यक्तीला
कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही तालिबानी दहशतवादी संघटना असल्याचा आरोप करत ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन नाकारला आहे. न्यायमूर्ती राजेंद्र कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने त्याला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. तसेच अर्जदाराविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे त्याची याचिका फेटाळून लावली आहे, असं राजेंद्र वर्मा यांनी म्हटलंय.

रणबीर-आलिया डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ? इटलीमध्ये पार पडणार सोहळा!

लग्नसराई सुरू झाली आहे. लग्नाचा हा सीझन सुरू होताच बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान बी-टाऊनचे हिट कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.दोघांच्या लग्नाबाबत अशा बातम्या समोर येत आहेत, हे दोघांचे चाहते खूप उत्सुक होणार आहेत. आलिया-रणबीरचे लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहे.नीतू कपूर लवकरच आलिया भट्टला नववधूच्या रुपात आपल्या घरात आणणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते खूप उत्सुक आहेत. गेल्या वर्षीही आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत बातम्या आल्या होत्या, मात्र कोरोनामुळे त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला होता.असं म्हटलं जातं. आता अशी बातमी आहे की, कतरिना कैफ आणि विकी कौशलप्रमाणे हे कपलही या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.

T20 World Cup: क्रिकेटच्या मैदानात टळली मोठी दुर्घटना, एकाच बॉलवर 2 वेळा वाचला अंपायरचा जीव

टी20 वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं गतविजेत्या वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. या मॅचमध्ये अंपायरिंग करणारे अलीम डार एकाच बॉलवर 2 वेळा थोडक्यात बचावले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. डार यांनी ज्या पद्धतीनं चपळता दाखवत स्वत:चा जीव वाचवला त्याबद्दल त्यांची सर्वजण प्रशंसा करत आहेत.

वेस्ट इंडिजच्या इनिंगच्या 20 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. यावेळी स्ट्राईकवर असलेल्या पोलार्डनं प्रिटोरियसच्या बॉलवर सरळ शॉट मारला. तो बॉल वेगानं अंपायरच्या दिशेनं गेला. त्यावेळी डार यांनी तातडीनं बाजूला होत स्वत:ला दुखापतीपासून वाचवले. पण या गडबडीत ते खाली पडले.

दिवाळीपर्यंत 50000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचे दर

सणासुदीच्या काळात सातत्याने होत असलेल्या वाढीमध्ये सोन्याच्या किंमतीत मंगळवारी किरकोळ घसरण झाली होती. 5 रुपये प्रति तोळाने सोन्याचे दर कमी झाले होते. यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 47,153 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर काल चांदीचे दरही काल 287 रुपयांनी कमी होऊन 64,453 रुपये प्रति किलोवर बंद झाले होते. या किरकोळ चढउतारानंतर सोन्यात आता गुंतवणूक केल्यास तुम्हाला दिवाळीपर्यंत आठवडाभरात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.