जून महिन्यापासून नाशिक जिल्ह्याकडे पाठ फिरवलेला पाऊस अखेर सुरु झाला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. मात्र, जिल्ह्यात सरासरी 28 टक्केच पावसाची नोंद झाली आहे. पाऊस कमी प्रमाणात झाल्यानं शेतीची कामं देखील खोळंबली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 48 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळं संतंतधार पाऊस कायम राहिल्यास शेतकरी पेरणीची काम करु शकतात.
नाशिक जिल्ह्यातील यंदाचं पावसाचं प्रमाण हे गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झालं आहे. गतवर्षीच्या तुलनेत 9 टक्के पाऊस कमी झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 48 टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पेरण्यांच्या कामाला वेग येणार आहे. मराठवाड्याची भिस्त असलेल्या दारणा समूहात गतवर्षीपेक्षा 3 टक्के कमी साठा असल्याचंही समोर आलं आहे.
जुलै महिन्याचा पंधरवडा उलटूनही जिल्ह्यात पाऊस झालेल्या नसल्यानं नाशिककरांची चिंता वाढलेली होती. संततधार सुरु असली तरी जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ही अत्यल्प पाणी साठा शिल्लक आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मोजका पाणीसाठा शिल्लक असल्याने नाशिककरांवर पाणी कपातीच संकट ओढावलं आहे. आठवड्याच्या दर गुरुवारी शहरात पाणी बंद राहणार आहे. या आठवड्यापासून पाणी कपातीचा निर्णय लागू करण्यात येणार आहे. गंगापूर धरणातील पाणी साठा 50 टक्केंपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पाणी कपातीचा निर्णय लागू राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे.