इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेत्री हीना पांचाळला अखेर जमीन मंजूर करण्यात आला आहे. हीना पांचाळसह आणखी 24 जणांना या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अंमली पदार्थ बाळगणारा व्यक्ती आणि ज्याच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती त्या व्यक्तीचा जमीन फेटाळण्यात आला आहे.
नाशिकमधील इगतपुरीत हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी हीनासह अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. 26 जून रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली होती.
मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन सुरु होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते. गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरीतील बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांची टीम त्या बंगल्यावर दाखल झाली होती.
पोलिसांनी छापेमारी करत पार्टीत असलेले 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं होतं. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तसेच पोलिसांनी स्काय व्हिला येथील स्टाफला देखील ताब्यात घेतलं. अटक झालेल्या व्यक्तींमध्ये ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळचा समावेश आहे. याशिवाय इटालियन महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, बॉलिवूडच्या दोन महिला कोरिओग्राफर यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.