भारत आणि श्रीलंका यांच्यात पुण्यात दुसरा टी२० सामना झाला. यात भारताला १६ धावांनी पराभव पत्करावा लागला. गोलंदाजांनी धावांची खैरात केली तर त्यानतंर आघाडीच्या फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावण्याचं काम केलं. मात्र या सामन्यात पराभवाचे खापर हार्दिक पांड्याने अर्शदीप सिंहवर फोडलं. त्याने फक्त दोनच षटके गोलंदाजी केली मात्र तो महागडा ठरला. अर्शदीपने त्याच्या दोन षटकात पाच नो बॉल टाकले.
सामन्यानंतर बोलताना हार्दिक पांड्या अर्शदीप सिंहवर भडकला. त्याने म्हटलं की, गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत पॉवरप्लेमध्ये आम्हाला मोठा धक्का बसला. आम्ही साध्या चुका केल्या ज्या या पातळीवर करायला नाही पाहिजे. शिकणं सुरु ठेवायला हवं, क्रिकेटमध्ये काही मुलभूत गोष्टी आपण नियंत्रणात ठेवू शकतो. कधी कधी तुमचा दिवस खराब असू शकतो पण मुलभूत गोष्टींपासून दूर जायला नको. अशा स्थितीत हे खूपच कठीण होऊन बसतं अशा शब्दात संघाच्या कामगिरीवर पांड्याने आपला संताप व्यक्त केला.
अर्शदीपने एक दोन नव्हे तर ५ नो बॉल टाकले. यावर हार्दिक पांड्याने म्हटलं की, हे काही दोष देण्याबद्दल नाही पण नो बॉल हा गुन्हा आहे. मी सुद्धा याआधी नो बॉल टाकले होते. अर्शदीपने मागे जाऊन अशा साध्या चुका या पातळीवर होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २०६ धावा केल्या. त्यानतंर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला १९० धावांपर्यंत मजल मारता आली. एकवेळ भारताची अवस्था ५ बाद ५७ अशी झाली होती. तेव्हा सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी ९१ धावांची भागिदारी केली. यामुळे विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. पण अखेरच्या षटकात श्रीलंकेने बाजी मारली.