अंडर-19 वर्ल्डकप 2022 साठी (19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या ज्युनिअर निवड समितीने यश धुलच्या नेतृत्वाखालील 17 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. चार वेळा चॅम्पियन बनलेला भारत पाचव्या विजेतेपदासाठी दावा करणार आहे. 14 जानेवारीपासून वेस्ट इंडिजमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2020 मध्ये प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती, मात्र भारताला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. संघाची कमान दिल्लीच्या यश धुलच्या हाती आहे. त्याच्याआधी विराट कोहली आणि दिल्लीचा उन्मुक्त चंद यांनीही अंडर-19 विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावले आहे. अशा परिस्थितीत धुललाही तोच वारसा पुढे चालवायला आवडेल. धुलसह संपूर्ण भारतीय संघ सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव शिबिरात सहभागी होत आहे. विश्वचषकापूर्वी संघ यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये भाग घेणार आहे.
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात 17 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाच खेळाडूंचा स्टँडबाय म्हणून समावेश करण्यात आला आहे. एसके रशीद संघाचा उपकर्णधार असेल.
यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगकृष रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्या यादव (यष्टीरक्षक), राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आर. एस. हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गरव सांगवान.
स्टँडबाय खेळाडू – ऋषित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, पीएम सिंग राठोड
16 संघांच्या या स्पर्धेत चार गट असून भारताला ब गटात ठेवण्यात आले आहे. भारताशिवाय या गटात दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडा यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर लीगच्या टप्प्यात पोहोचतील आणि विजेतेपदासाठी दावा करतील. भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. संघाचा दुसरा सामना 19 जानेवारीला आयर्लंडशी आणि शेवटचा ग्रुप सामना 22 जानेवारीला युगांडासोबत आहे.