काँग्रेसला गळती लागलेली असतानाच खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा राज्यातील नांदेडमार्गे जळगाव असा १६ दिवस प्रवास करणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात २००९ मध्ये काँग्रेसचे सर्वाधिक २४ आमदार विजयी झाले होते. परंतु नंतरच्या काळात काँग्रेसचा दबदबा कमी होत गेला. २०१९ च्या निवडणुकीत केवळ १५ आमदार विजयी झाले. विदर्भात गलितगात्र झालेल्या काँग्रेसला राहुल गांधी यांची ‘भारत जोडे यात्रा’ नवसंजीवनी आणि उभारी देणारी ठरेल का? असा प्रश्न सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
जनमानसात घसरत चाललेली काँग्रेसची प्रतिमा सुधारण्यासाठी व २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीपर्यंत ‘भारत जोडो यात्रा’ तीन हजार पाचशे किमीचा पायी प्रवास करून १२ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशातून दीडशे दिवस प्रवास करणार आहे. सध्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ची सर्वत्रच जोरदार चर्चा असून यानिमित्ताने २०२४ ची पूर्वतयारी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. सद्यस्थितीत काँग्रेसला उतरती कळा लागली असून अंतर्गत मतभेद वाढतच चालले आहेत.
अनेक मोठे नेते काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नांदेडमधून जळगाव असा ३८३ किमीचा प्रवास करीत १६ दिवस राज्यात मुक्कामी असेल. चांदापासून बांदापर्यंत पोहचलेली काँग्रेस सध्या कमकुवत होत चालली आहे. विदर्भातदेखील काँग्रेसच्या मजबूत असलेल्या बुरुजाला सुरुंग लागत आहेत. ग्रामीण भागात काही प्रमाणात काँग्रेसचा प्रभाव दिसत असला तरी शहरी भागात काँग्रेस पिछाडीवर पडली आहे. विदर्भातून ६२ आमदार विधानसभेवर निवडून येतात. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक २४ आमदार निवडून आले होते. परंतु नंतरच्या काळात यात सातत्याने घसरण होत गेली. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे १५ आमदार निवडून आले होते. ९ जागांचा फटका काँग्रेसला बसला. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र, ही यात्रा गळती रोखून विदर्भात काँग्रेसला उभारी देणार का? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे.