महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा नव्या वळणावर, होळीलाच भाजपची साद, ठाकरे देणार प्रतिसाद?

मागच्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे उलटफेर बघायला मिळत आहेत, पण आता पुन्हा एकदा राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावर आलं आहे, याला कारण ठरतंय भाजपने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला घातलेली साद. होळीच्या निमित्ताने उmपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधानं केली आहेत.

राजकारणामध्ये सर्व विरोधकांना माफ केलं आहे. झालं गेलं सगळं विसरून जा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी धुळवडीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केलं आहे. एकेकाळी आपण बदल्याची भाषा केली होती, पण आता सर्व वैर होळीच्या आगीमध्ये स्वाहा केल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

वर्षाचे 365 दिवस शिमगा करणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. 365 दिवस शिमगा साजरा करण्यापेक्षा एकच दिवस शिमगा साजरा करा, असा टोला फडणवीसांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावला आहे.

दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अशाच पद्धतीचं विधान केलं आहे. ‘आजचा दिवस हा मनभेद आणि मतभेद बाजूला करून एकत्रितपणे काम करण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्रातसुद्दा सर्वच पक्षांनी, सर्वच नेह्यांनी सर्व स्तरावरचे मनभेद दूर करून महाराष्ट्राला देशात नंबर एक करण्याकरता सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे,’ असं बावनकुळे म्हणाले.

‘मी विरोधकांना विनंती करतो, आजपासून मतभेद आणि मनभेद दूर करून हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीकोनातून पुढे कसा जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन कसं हे राज्य पुढे नेता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,’ असं आवाहन बावनकुळे यांनी केलं.

‘संजय राऊतांना विनंती आहे त्यांनी आजपासून मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्रितपणे काम करावं. टोकाचं राजकारण झालंय ते विसरून महाराष्ट्र विकासाने पुढे गेला पाहिजे, आम्ही आज आमच्यापासून ही सुरूवात करत आहोत, सर्वांनी त्याला साथ द्यावी. संजय राऊत साहेबांनी उद्यापासून कुठलाही मनभेद आणि मतभेद न ठेवता आमच्या हातात हात घालून राज्याच्या विकासासाठी काम करण्याची गरज आहे,’ असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.