मराठी चित्रपटातील सिंहासन, सामना आणि पिंजरा हे तीन चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानले जातात. ३१ मार्च १९७२ रोजी मराठी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील “माईलस्टोन” ठरलेला व्ही. शांताराम यांचा “पिंजरा” चित्रपट प्रदर्शित झाला. आज ३१ मार्च रोजी ४८ वर्षे पूर्ण झाली. १९७२ साली प्रदशीत झालेल्या या चित्रपटाची जादू एवढ्या वर्षांनंतरही प्रेक्षकांवर कायम आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला रंगीत सिनेमा म्हणून सुद्धा “पिंजरा” या चित्रपटाची विशेष ओळख आहे. हा चित्रपट मराठीत इतका तुफ़ान चालला होता की हेच कलाकार घेऊन याच विषयावर “पिंजरा” याच नावाने हिंदीत सुद्धा हा चित्रपट बनवला गेला होता. ‘पिंजरा’.. त्यो कुनाला चुकलाय? अवो मानसाचं घरतरी काय असतं? त्योबी एक पिंजराच की, हे तत्त्वज्ञान आपल्या रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातील एक नर्तकी आणि ‘व्यक्ती मेली तरी चालेल समाजातील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत’ या महान तत्त्वावर श्रद्धा असलेला एक माणूस या दोघांच्या संघर्षाची कथा ‘पिंजरा’ चित्रपटात उत्कृष्टपणे मांडण्यात आली. चंद्रकला आणि गुरुजी यांच्यावर चित्रीत झालेले प्रत्येक दृश्य आणि संवाद सिनेरसिकांच्या आजही लक्षात आहे. प्रत्येकाच्या मनःपटलावर पिंजरा कलाकृतींच एक वेगळंच स्थान आहे. डॉ. श्रीराम लागू, संध्या, नीळू फुले, वत्सला देशमुख यांच्या यांनी आपल्या अभिनयाने हा चित्रपट उंचीवर नेऊन ठेवला. या सिनेमाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘पिंजरा’ ही एका तत्वनिष्ठ व ब्रम्हचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणीक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतीक, आत्मीक व सामाजीक अध:पतनाची कथा आहे. ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. चित्रपटातील ‘आली ठुमकत नार’, ‘दे रे कान्हा चोळी आणि लुगडी’, ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘मला इष्काची इंगळी डसली’ ही आणि अन्य सर्व गाणी/लावण्या आजही लोकप्रिय आहेत. जगदीश खेबुडकर यांची गाणी आणि राम कदम यांच्या संगीताची जादू कायम आहे.
संजीव वेलणकर, पुणे