चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार

चिन्मय उदगीरकर, पूजा सावंत, सिद्धार्थ जाधव यांना सुविचार गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. नाशिक येथील प्रतिष्ठित अशा सुविचार गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 5 मार्च रोजी अभिनेता चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासह 10 मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती सुविचार मंचचे आकाश पगार यांनी दिलीय. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या शुभहस्ते, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्काराने मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असल्याचे पगार म्हणाले.

समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या एकूण 10 मान्यवरांची सुविचार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आली. चित्रपट अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना सुविचार नाशिक गौरव या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

हेमंत राठी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ.अतुल वडगावकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा.शं. क. कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडू ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गोरवाडकर हे सदस्य असलेल्या निवड समितीने सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तींची निवड केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.