आजच्या दिवशी आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो. मराठी भाषेविषयी अभिमानानं बोलतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रमज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. मराठी भाषेचा जगात दहावा क्रमांक लागतो. मराठी भाषा महाराष्ट्रातील आणि बेळगाव, निपाणी, कारवारसह कर्नाटकात राहिलेल्या गावांमध्ये बोलली जाते. मराठी भाषिक लोक जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत. मराठी भाषा या लोकांच्या निमित्तानं जगभर गेलीय.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण संसदीय लोकशाही व्यवस्था स्वीकारली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसदेत पहिल्यांदा संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या मराठी भाषेतून भाषण क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलं. मराठी भाषेचा आवाज संसदेच्या सभागृहात नाना पाटील यांनी मांडला. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न सोडवावा ही मागणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती.
स्वातंत्र्यानंतर झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून कम्युनिस्ट पक्षाकडून क्रांतिसिंह नाना पाटील विजयी झाले होते. खासदार झाल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मराठी भाषेतील लोकसभेतील पहिलं भाषणं केलं. ते भाषण संपूर्ण देशभर गाजल्याची माहिती आहे. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या जनतेनं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषणाचं कौतुक केलं.
मराठी भाषिक लोकांच्यावर त्याचप्रमाणे गुजराथी भाषिक लोकांच्यावर सरकारने जो घोर अन्याय केला व जनतेची लोकशाही मगाणी दडपूण टाकण्याकरिता जी घोर दडपशाही केली, त्याचा निषेध करण्याकरिता मी बोलणार आहे.
काँग्रेसने 30 वर्ष भाषावार प्रांतरचनेवर आश्वासनं दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देऊ, म्हणून सांगितले, आम्ही त्याची वाट पाहात राहिले पण स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसनं टोपी फिरवली. तीन वेळा कमिशन व समिती नेमली. शेवटी दिले मात्र काहीच नाही. भारतात सर्वांना भाषावर प्रांत दिले. मग मराठी भाषेच्या महाराष्ट्रावरच असा अन्याय कशाकरिता? महाराष्ट्राने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळावा म्हणून लोकशाहीच्या मार्गाने व शांततेनं चळवळ सुरु केली, असं नाना पाटील म्हणाले होते.