आज दि.४ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

अजित पवारांच्या नव्या कार्यालयात ‘तो’ फोटो पाहून शरद पवार भडकले

अजित पवार व शरद पवार यांच्या नात्यात अजूनही फूट पडलेली नाही हे दाखवणारा असा हा व्हिडीओ आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो लावल्याचे दिसतेय. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या व्हिडिओवरूनही अजित पवारांवर निशाणा साधला आहे. “मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनीच आमचे फोटो वापरावे. ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला त्यांनी माझा फोटो वापरू नये, माझा फोटो कुणाला वापरू द्यायचा हा माझ्या हयातीत तरी माझाच निर्णय आहे “असे त्यांनी ठामपणे सांगितले

यूजीसीकडून शुल्क परताव्याचे धोरण जाहीर

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीचे शुल्क परतावा धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्याने ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण शुल्क, तर ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास प्रक्रिया शुल्क म्हणून कमाल एक हजार रुपये वजा करून अन्य संपूर्ण शुल्काचा परतावा उच्च शिक्षण संस्थेने करणे बंधनकारक आहे. उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना शुल्क आणि मूळ कागदपत्रे परत न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

समान नागरी संहितेमधून आदिवासी समाजासाठी वेगळा विचार व्हावा; संसदिय समिती अध्यक्ष सुशीलकुमार मोदींची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश, एक कायदा अशी घोषणा करून देशात लवकरच समान नागरी संहिता, कायदा (UCC) मंजूर केला जाईल, याचे सुतोवाच केले. योगायोगाने त्याचवेळी २२ व्या विधी आयोगाने समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी विविध धर्म आणि संघटनाकडून सूचना व हरकती मागितल्या आहेत. या सर्व घडामोडी दरम्यान सोमवारी (दि. ३ जुलै) संसदिय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी ईशान्य भारत आणि इतर ठिकाणच्या आदिवासींच्यावतीने महत्त्वाचा मुद्दा मांडला. भारतातील विविध भागांत राहणाऱ्या आदिवासी समाजामध्ये विविध प्रथा-परंपरा जपल्या जातात. प्रत्येक आदिवासी समाजाच्या रूढी-पंरपरा आहेत आणि त्याला संविधानाने संरक्षित केलेले आहे, त्यामुळे समान नागरी संहितेमध्ये त्यांचा विचार केला जावा, असे मोदी यांनी सांगितले.

दादांच्या एन्ट्रीने दादांची एक्झिट! अजित पवारांच्या येण्याने भाजपचीच गोची

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-भाजपशी हातमिळवली केली आहे. विश्वासू लोकांनीच दगा दिल्याने शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. पण पुण्यात भाजपची पुरती गोची होणार आहे. कारण अजित पवारांनी पालकमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. सध्या पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. भाजप काय मांडवली करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

झिम्बाब्वेमधील नव्या लीगला लवकरच होणार सुरुवात

झिम्बाब्वेमध्ये विश्वचषक पात्रता फेरीनंतर २० जुलैपासून झिम आफ्रो टी १० लीग खेळवली जाणार आहे. पहिल्या सत्रात एकूण ५ संघ सहभागी होतील. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे अनेक माजी दिग्गज चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसणार आहेत. २००७ टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यात वेगवान गोलंदाज एस श्रीशांत, युसूफ आणि इरफान पठाण आणि रॉबिन उथप्पा यांचा समावेश आहे. याशिवाय स्टुअर्ट बिन्नी आणि पार्थिव पटेल हे देखील झिम आफ्रो टी-१० लीगच्या पहिल्या सत्रात खेळताना दिसणार आहेत. लीगचा उद्घाटन हंगामा २० जुलैपासून सुरू होईल आणि अंतिम सामना २९ जुलै रोजी होईल. स्पर्धेतील सर्व सामने झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे होणार आहेत. २०१७ मधील अबू धाबी टी-१० लीग नंतर ही सर्वात हाय-प्रोफाइल टी-१० लीगपैकी एक असेल. २०१७ पासून, कतार टी-१० लीग आणि युरोपियन क्रिकेट लीगसह अनेक १० षटकांच्या लीग उदयास आल्या आहेत.

प्राजक्ता गायकवाडनं घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘आई माझी काळूबाई’ या मालिकांमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली आहे. अभिनेत्रीने फारच कमी वेळेत मोठी लोकप्रियता मिळवली आहे.प्राजक्ता गायकवाडनं नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे.महाराष्ट्राच रविवारी मोठा राजकीय भूकंप घडला. अशातच सोमवारी काही प्रसिद्ध मराठी कलाकारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा स्थितीत प्राजक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे विविध चर्चां रंगल्या आहेत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.