अजित पवार शिंदेंच्या एक पाऊल पुढे, शपथविधीआधीच केला करेक्ट कार्यक्रम!
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्याचं बोललं जात होतं, पण आता अजित पवारांनी बंड नव्हे, तर पूर्ण राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकल्याचं समोर आलंय. एवढच नाही तर त्यांनी आपली राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचंही निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हणलं आहे. याबाबत अजित पवारांनी 30 जूनलाच निवडणूक आयोगात याचिका दाखल केल्याचं समोर आलंय, त्यामुळे आता राष्ट्रवादी कुणाची? हा वाद निवडणूक आयोगात पोहोचल्याचं पाहायला मिळतंय.आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस, जे ठाकरेंच्या शिवसेनेबाबत घडलं, आता तसंच काहीसं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही घडतंय. एक वर्षाआधी महाराष्ट्राने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जी राजकीय रस्सीखेच पाहिली, तशीच काही स्थिती आता राष्ट्रवादी पक्षावरुन अजित पवार आणि शरद पवारांमध्ये सुरु झाल्याचं चित्र आहे.
“शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जातील, कारण…”, भाजपा खासदाराचा मोठा दावा!
सध्या महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आज अजित पवार व शरद पवार गटाच्या स्वतंत्र बैठका मुंबईत आयोजित करण्यात आल्या होत्या. यात बोलताना दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर तुफान टीका-टिप्पणी केली. या पार्श्वभूमीवर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट चर्चेत असताना दुसरीकडे शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, ही शक्यता चक्क भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराने वर्तवली आहे!भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी नेहमीच त्यांच्या ट्वीटमधून स्पष्ट भूमिका मांडताना दिसतात. या भूमिकांमधून ते अनेकदा स्वपक्षाच्याच विरोधात मत मांडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर आज स्वामींनी केलेल्या एका ट्वीटची जोरदार चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळातही पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून एकमेकांवर टोकाला जाऊन टीका करणारे शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या कानावर ही बाब पडल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
विजयानंतर जॅक्सन सिंगने फडकावला मणिपूरचा झेंडा
टीम इंडियाने सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. बंगळुरूच्या ‘श्री कांतीरावा’ स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असा पराभव केला. पूर्णवेळ आणि नंतर अतिरिक्त वेळेपर्यंत १-१ अशी बरोबरी होती. यानंतर गुरप्रीत सिंगच्या उत्कृष्ट गोलकीपिंगमुळे टीम इंडियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला. सामन्यानंतर एक ट्वीट व्हायरल झाले, ज्यामध्ये असे लिहिले होते, “जॅक्सन सिंग, महेश सिंग आणि उदांता सिंग, हे तिघेही सॅफ चॅम्पियनशिप २०२३ जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते आणि ते मणिपूरचे आहेत. तेच मणिपूर, जे गेल्या दोन महिन्यांपासून धगधगत आहे.
देशातील १२ राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री
राज्यात अजित पवार आणि छत्तीसगडमध्ये टी. एस. सिंगदेव यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या यादीत भर पडली आहे. देशातील १२ राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री सध्या कार्यरत आहेत.उपमुख्यमंत्रीपदाला घटनात्मक दर्जा काहीही नाही. फक्त राजकीय सोय लावण्याकरिता या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. १९६०च्या दशकात बिहारमध्ये अनुराग सिन्हा हे देशातील पहिले उपमुख्यमंत्री होते. यानंतर विविध राज्यांमध्ये या पदाची निर्मिती करण्यात आली. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे उपमुख्यंत्रीपदी आहेत. उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री आहेत. गेल्याच आठवड्यात छत्तीसगडमध्ये टी. एस. सिंगदेव यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.
आयपीएल २०२४मध्ये खेळण्यासाठी ‘हा’ पाकिस्तानचा खेळाडू ब्रिटिनचे नागरिकत्व घेणार?
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला २०२४ मध्ये ब्रिटीश पासपोर्ट मिळणार आहे, मग तो यानंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसणार का? असे प्रश्न सध्या क्रिकेट वर्तुळात विचारले जात आहेत. मोहम्मद आमिरने २०१६ मध्ये ब्रिटीश नागरिक आणि वकील नरजीस खान यांच्याशी लग्न केले होते. मोहम्मद अमीर २०२० पासून इंग्लंडमध्ये राहत आहे. ब्रिटिश पासपोर्टसाठी, यूकेमध्ये ४ वर्षे राहणे आवश्यक आहे. मोहम्मद अमीर पुढील वर्षी ब्रिटनमध्ये ४ वर्षे पूर्ण करणार आहे. यानंतर पाकिस्तानच्या या माजी वेगवान गोलंदाजाला ब्रिटिश पासपोर्ट मिळणार आहे.
रॉजर फेडरर निवृत्तीनंतर पहिल्यांदाच पोहोचला विम्बल्डनमध्ये
२० वेळा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर विम्बल्डन ओपन २०२३च्या दुसऱ्या दिवशी कोर्टवर आला. हे त्याच्या आवडत्या मैदानांपैकी एक आहे. फेडरर मंगळवारी विम्बल्डनमध्ये दाखल झाला, जिथे त्याने विक्रमी आठ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. लंडनमधील ओटू एरिना येथे झालेल्या लेव्हर कप दरम्यान त्याने गेल्या सप्टेंबरमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर तो पहिल्यांदाच त्याच्या आवडत्या मैदानावर पोहोचला. यावेळी ‘किंग फेडरर’ रॅकेटशिवाय मैदानात उतरला पण त्याच्यासाठी प्रेक्षकांच्या टाळ्यांची कमतरता नव्हती. मंगळवारी सेंटर कोर्टात दुसऱ्या दिवसाचे सामने सुरू होण्यापूर्वी स्क्रीन्सवर व्हिडिओ प्ले करण्यात आले.
२५ बळी घेणाऱ्या ट्रॅव्हल्सला ‘पीयूसी’ प्रमाणपत्र देणाऱ्या केंद्राचा परवाना रद्द
महामार्गावरील अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सला अपघातानंतर ‘पीयूसी’ प्रमाणपत्र देणाऱ्या पीयूसी केंद्राचा परवाना अखेर रद्द करण्यात आला. घटनेची दखल घेत यवतमाळ ‘आरटीओ’ने ही कारवाई केली.येथील उप प्रादेशिक परिवहन विभागाने आज, बुधवारी ही कारवाई केली. समृद्धी महामार्गावर ३० जून रोजी अपघात झाल्यानंतर २५ बळी घेणाऱ्या ट्रॅव्हल्सचे १ जुलै रोजी ‘पीयूसी’ प्रमाणपत्र काढण्यात आले. ही बाब तपासात समोर आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत ट्रॅव्हल्स मालकासह पीयूसी केंद्र चालकाला नोटीस बजावण्यात आली होती.
आरबीआयचा मास्टर प्लॅन! ‘रुपया’ लवकरच होणार आंतरराष्ट्रीय चलन?
रुपयाच्या आंतरराष्ट्रीयीकरणासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या समितीने सुचविल्या आहेत. यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या स्पेशल ड्रॉइंग राईट्स (एसडीआर) बास्केटमध्ये भारतीय चलनाचा समावेश करण्याबाबतची शिफारसही आहे.रिझर्व्ह बँकेच्या आंतरविभागीय गटाने कार्यकारी संचालक आर.एस.राथो यांच्या नेतृत्वाखाली याबाबत अहवाल सादर केला आहे. रुपयांच्या आंतरराष्ट्रीयीकरणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याआधी करण्यात आलेल्या प्रयत्नांना यासाठी पुढे न्यावे लागेल, असे समितीने अहवालात म्हटले आहे. द्वीपक्षीय व्यापार करताना रुपयात व्यवहार करण्यास आणि अनिवासी भारतीयांना देशात व देशाबाहेर रुपयांमध्ये खाती उघडण्यास प्रोत्साहन द्यावे लागेल, असेही समितीने अहवालात सुचविले आहे.
१५ हजार कोटींची ‘जीएसटी’ चोरी उघड; बनावट ४ हजार ९७२ जीएसटी नोंदणी केली रद्द
वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने मागील दोन महिन्यांपासून बनावट जीएसटी नोंदणी आणि करचुकवेगिरीची मोहीम हाती घेतली आहे. यात ४ हजार ९७२ बनावट जीएसटी नोंदणी रद्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर १५ हजार कोटी रुपयांची करचुकवेगिरी उघड झाली आहे. ही मोहीम १५ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.याबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे सदस्य शशांक प्रिया म्हणाले की, जीएसटी विभागाकडून १६ जूनपासून मोहीम सुरू आहे. त्यात मोठ्या प्रमाणात बनावट जीएसटी नोंदणी उघडकीस आली आहे. त्यामुळे जीएसटी नोंदणी आणि विवरणपत्रे भरण्याची प्रक्रिया आणखी कठोर करण्यासाठी धोरणात्मक बदल करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांनी ६९ हजार ६०० जीएसटी क्रमांकाची प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली. त्यातील ५९ हजार १७८ क्रमांकांची खातरजमा करण्यात आली आहे. उरलेले १९ हजार ९८९ जीएसटी क्रमांक अस्तित्वात नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यातील ११ हजार १५ जीएसटी क्रमांक निलंबित करण्यात आले आणि ४ हजार ९७२ रद्द करण्यात आले.
SD Social Media
9850 60 3590