नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा धोका अधिक वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 676 रुग्ण आढळून आले आहेत. सद्य स्थितीत 180 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू आहेत. तर 432 रुग्ण यावर यशस्वी मात करून घरी परतले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यात 64 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस आटोक्यात आणण्याचं जिल्हा आरोग्य विभागापुढे मोठं आव्हान आहे. हा धोका बघता कोरोना बाधित रुग्णांनी म्युकरमायकोसिसची लक्षण आढळल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असं जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
काही दिवसांपूर्वी मोठ्या वयोगटातील लोकांपुरता मर्यादित असलेल्या म्युकरमायकोसिसने (Mucormycosis) आता लहान मुलांनाही कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत म्युकरसमायकोसिसमुळे 10 दिवसांपूर्वी तीन लहान मुलांचे डोळे काढण्याची वेळ ओढावली होती. तर मुंबईत उपचार घेत असलेल्या आणखी एका 16 वर्षांच्या मुलाला कोविडमधून बरे झाल्यानंतर मधुमेहाची व्याधी जडल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. यामुळे आता आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. म्युकरमायकोसिस हा अत्यंत वेगाने शरीरात पसरतो. अशातच आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे
महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठं कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिलाय. पुढील 2-4 आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल झालेली असेल. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे. तिसऱ्या कोरोना लाटेत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आधीपेक्षा दुप्पट म्हणजे 8 लाखांपर्यंत जाण्याचा धोका असल्याचं सांगितलं. यात 10 टक्के रुग्ण लहान मुलं आणि तरुण असतील असंही नमूद करण्यात आलेय. संसर्गाचा हाच पॅटर्न दुसऱ्या कोरोना लाटेत देखील पाहायला मिळाला होता.