रात्रीस खेळ चाले…पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेने आपल्या तीन भागांच्या आजवरच्या प्रवासात बऱ्याच कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याचं काम केलं आहे. यासोबतच या मालिकेनं अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रल्हाद कुडतरकरचीही नवी ओळख निर्माण केली आहे. लॅाकडाऊनमुळं शूट बंद असल्यानं ‘रात्रीस खेळ चाले’ सध्या प्रसारीत होत नसली तरी, लवकरच शूट सुरू होऊन पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या साक्षीनं पुन्हा या मालिकेची वाटचाल सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

आपली लाडकी मालिका पुन्हा एकदा पाहता येणार असल्याने चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे. ‘अण्णा नाईक’, ‘माई’, ‘शेवंता’ या आपल्या आवडत्या पात्रांची वाट बघत आहेत.

‘रात्रीस खेळ चाले’चा तिसरा भाग येण्याबाबत प्रल्हाद म्हणाला की, ‘पहिला भाग झाल्यावर दुसरा भाग डोक्यात नव्हता. झी मराठीचे बिझनेस हेड निलेश मयेकर यांनी दुसऱ्या भागाची संकल्पना सुचवली. यात प्रिक्वेलला वाव मिळाला. दुसरा भाग संपतानाही तिसऱ्या भागाबाबत विचार केला नव्हता, पण एकंदरच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद पाहता तिसरा भाग आपोआपच आला. कारण तेव्हा प्रेक्षकांनी मालिका उचलून धरली होती. दुसरा भाग संपता संपताच तिसऱ्या भागाबाबत विचारणा सुरू झाली होती. या आधीही मालवणी मालिका आल्या, पण ‘रात्रीस खेळ चाले’ कौटुंबिक गोष्ट घेऊन आली. कोकणात अशा खूप गजाली असतात. आपण त्या कुठे ना कुठे ऐकलेल्या असतात.’

‘कोकणातल्या माणसांच्या स्वभावांची सांगड घालून ही मालिका आल्यानं प्रत्येक कॅरेक्टर लोकांना आपल्या घरातील वाटलं. हे या मालिकेचं श्रेय आहे. या मालिकेत नायक-नायिका नाहीत. कोकणातल्या बऱ्याच गावांमध्ये पांडू, माई आणि सुसल्यासारखी कॅरेक्टर्स असतात. ही सर्व कॅरेक्टर्स लोकांसोबत कुठेतरी कनेक्ट झाल्यामुळेच आपलेपणा वाटला. मालिकेबाबत खूप पूर्वी वाद झाला होता, पण तीन भाग आल्यानंतर आता वाद नव्हे, तर आशीर्वाद आहेत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.