रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात 50 रुपयांवर गेलेल्या प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पुन्हा 10 रुपयांपर्यंत खाली येतील. 1 जुलैपासून या नियमाची अंमलबजावणी होईल.
लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज स्थानकांवर गेल्यावर्षी मार्चपासून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये केली होती. तसेच हे तिकिट सरसकट न देता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना सोडण्यास नागरिकांनाच दिले जात होते.
आता रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होऊ लागली आहे, त्यामुळे चारही स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 10 रुपये करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मनोझ झंवर यांनी दिली.
राज्यातील कोरोनाची साथ ओसरल्यामुळे रेल्वे विभागाकडून जुलै महिन्यात इंद्रायणीसह 11 एक्स्प्रेस गाड्या पुन्हा सुरु केल्या जातील. काही दिवसांपूर्वीच मुंबई-नाशिक प्रवासासाठी पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. त्यामुळे मुंबई-नाशिक अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता.
मुंबई-पुणे प्रवासासाठी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन येत्या 26 तारखेपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. महत्वाचे म्हणजे आता डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अजून आनंदी व सुखकारक होईल.