ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा
आणणाऱ्यांना फासावर लटकवू
आपण याला दुसरी लाट म्हणत आहोत, पण खरंतर ही त्सुनामी आहे, असं सांगत न्यायालयाने केंद्र सरकारला तयारी विषयी विचारणा केली. मे मध्यावतीपर्यंत करोना रुग्णसंख्या शिखर गाठणार असून, केंद्र सरकारने मुलभूत आरोग्य सुविधा, हॉस्पिटल्स, वैद्यकीय कर्मचारी (डॉक्टर, नर्स यांच्यासह इतर), लस आणि ऑक्सिजन यांची काय तयारी आहे, अशी विचारणाही न्यायालयाने केंद्राला केली आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या मुद्द्यावरून न्यायालयाच्या संतापाचा कडेलोट झाला. ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या केंद्र, राज्य वा स्थानिक प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याचं नाव दिल्ली सरकारने सांगावं. आपण कोणालाही पाठिशी घालणार नाही. ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्यांना फासावर लटकवू, असा सज्जड दम दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी दिला.
मंत्री अनिल देशमुखांच्या
घरी सीबीआयचे छापे
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले. सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सीबीआयचा अहवाल
कोर्टात येईल तेव्हा पाहू : राऊत
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सीबीआय आपलं काम करत आहेत. सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टात येईल. तेव्हा काय करायचं ते पाहू, असं संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रवादीने केला
छापेमारीचा निषेध
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांच्या घरी मालमत्तांच्या ठिकाणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने छापे टाकले आहेत. याप्रकरणी देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत प्रतिक्रीया दिली आहे. केंद्र सरकार कोरोना संकटातील अपयश लपविण्यासाठीच सीबीआय छाप्यांचा उद्योग केला जात असल्याचे पक्षाने म्हटले आहे. तर, पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, सीबीआयने न्यायालयाला प्राथमिक अहवाल दिला नसून या छापेमारीचा आम्ही निषेध करीत आहोत.
पाकिस्तानने केले
भारताचे सांत्वन
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताचं सांत्वन करणारं ट्वीट केलं आहे. ‘कोरोनाच्या संकटात सापडलेल्या भारतातील नागरिकांच्या संवेदना समजू शकतो. या कोरोनामुळे पीडित शेजारी आणि जगभरातील लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. ते लवकर बरे व्हावे. माणुसकीच्या नात्याने या जागतिक संकटाला तोंड देणं आवश्यक आहे’, असं ट्वीट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.
नेत्यांचे अशोभनीय वर्तन
डेहराडूनमध्ये गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी तत्काळ कोरोना किट उपलब्ध करण्याऐवजी आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना किटवर माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांच्या फोटोवर नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या फोटोचे स्टिकर चिकटवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर किट उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. डेहराडूनमध्ये मुख्य आरोग्य अधिकार्यांच्या कार्यालयात जवळपास २४ आंगणवाडीसेविकांना माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांच्या फोटोवर नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या फोटोचे स्टिकर लावण्याचे काम देण्यात आले आहे. आरोग्य अधिकार्यांनी आत जाण्यास मज्जाव केल्याचे सांगत तिथल्या सुरक्षारक्षकाने माध्यम प्रतिनिधींना रोखले. आरोग्य अधिकार्यांना संपर्क केला असता ते फोन उचलत नसल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.
दिल्लीत ऑक्सिजनच्या तुटवड्याची
स्थिती अतिशय गंभीर
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ऑक्सिजनच्या तुटवड्याची स्थिती अतिशय गंभीर असल्याची बाब समोर येत आहे. एकट्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजनअभावी २० रुग्णांचा जीव गेला आहे. तर, याच हॉस्पिटलमध्ये सध्या २०० कोरोना बाधित ऑक्सिजनवर अवलंबून आहेत. तर हॉस्पिटलकडे वेळ अर्ध्या तासाचाच ऑक्सिजन साठा शिल्लक असल्याची माहिती जयपूर गोल्डन हॉस्पिटलचे डी के बालुजा यांनी सांगितले आहे. त्यामुळे या सर्व रुग्णांचा जीव टांगणीला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरोज हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने आम्ही एकाही रुग्णाला अँडमिशन देत नाही. उलट आम्हीच एमच्याकडील रुग्णांना डिस्चार्ज देत असल्याचे हॉस्पिटलने स्पष्ट केले आहे.
सरकारी केंद्रांवर पूर्वीप्रमाणेच
मोफत लसीकरण सुरूच राहील
कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना १ मेपासून आता खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपये देऊन लस घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सरकारी लसीकरण केंद्रांवर पूर्वीप्रमाणेच ४५ वर्षांहून अधिकवयाच्या सर्व लोकांना मोफत लसीकरण सुरूच राहील. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी १ मे पासून लागू होणाऱ्या नव्या लसीकरण धोरणाबाबत माहिती दिली. दरम्यान, १ मे पासूनच्या लसीकरणासाठी २४ एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे.
साफूवाला गाव ठरले संपूर्ण
लसीकरण करणारे पहिले
मोगा जिल्ह्यातील साफूवाला हे गाव संपूर्ण लसीकरण करणारे पंजाबमधील पहिले गाव ठरले आहे. या गावातील सर्व लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. आजूबाजूच्या गावांमधील लोकांनाही लस घेण्यासाठी ते प्रेरीत करत आहेत. आरोग्य विभागाकडून सरकारला दिलेल्या अहवालानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी साफूवाला गावातील नागरिकांचे कौतुक केले असून, ग्रामपंचायतीला विशेष दर्जा देण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदीनी
विचारसरणीत बदल करावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे स्वत:च्या विचारसरणीत बदल केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या फॅसिस्ट धाटणीच्या राजकारणापासून स्वत:ला जाणीवपूर्वक वेगळे केले. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि एक मधला मार्ग निवडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत:मध्ये बदल घडवले. पंतप्रधान मोदी यांनीही तसचं काहीसं केलं पाहिजे, असे रामचंद्र गुहा यांनी सांगितले.
ऑक्सिजन टँकर घेऊन
विमान भुवनेश्वरला रवाना
महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन एअर लिफ्ट करावा लागेल असं म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांनी मांडलेली कल्पना प्रत्यक्षात तेलंगाणामध्ये आली आहे. तेलंगाणा सरकारनं ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्याासाठी भारतीय हवाई दलाच्या मदतीनं ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
SD social media
9850 60 3590