राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्यापासून या नव्या सरकारचं पहिलं दोन दिवसीय अधिवेशन भरवण्यात येणार आहे. या अधिवेशनात सरकारची आज बहुमत चाचणी होणार आहे. या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे हे सरकार सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, अशी सूचना शरद पवारांनी आमदारांना दिली आहे.
महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर काल विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला. या निवडणुकीनंतर आता उद्या विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारची फ्लोर टेस्ट होणार आहे. नव्या सरकारचं उद्या बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कोणत्या नेत्यांना मंत्रिपद भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार यांच्या दाव्यानुसार ज्या आमदारांना मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळालं नाही तर पुन्हा ते काही दिवसांत स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेलं सरकार पुढच्या काही महिन्यांमध्ये सहज कोसळण्याची शक्यता आहे.
शरद पवारांचं आमदारांना मार्गदर्शन, काय म्हणाले शरद पवार?
“महाराष्ट्रातील नवं सरकार, शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा”, अशी सूचना शरद पवार यांनी सर्व आमदारांना केली.
“आपण राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या”, अशी महत्त्वाची सूचना पवारांनी आपल्या आमदारांना केली.
“शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना पाहायला मिळेल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“सरकार पडलं तर मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे तयारी आत्तापासून करायला लागा”, अशी महत्त्वाची सूचना शरद पवार यांनी आपल्या आमदारांना दिली.